केंद्र सरकारने देशातील छोटय़ा उद्योगांची क्षमता वाढविण्यासाठी मुद्रा योजना कार्यान्वित केली असून आर्थिकदृष्टय़ा त्यांना सक्षम करण्यासाठी आवश्यक ते भांडवल ‘विनातारण कर्ज’ स्वरूपात उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन खासदार अनिल शिरोळे यांनी केले.
आंध्र बँकेच्या पुणे विभागातर्फे विमाननगर येथील विडी कामगार वसाहत येथे मुद्रा बँकेची सुरूवात शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी शिशु गटातील दोनशे लाभार्थी महिलांना प्रत्येकी ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्जवाटप करण्यात आले. बँकेचे उपमहाप्रबंधक मुरली कृष्ण, नगरसेवक सचिन भगत, भाजपचे वडगावशेरी भागाचे अध्यक्ष महेंद्र गलांडे या प्रसंगी उपस्थित होते.
शिरोळे म्हणाले, ही योजना राबविताना एकूण कर्जाच्या ६० टक्के कर्ज हे शिशु गटासाठी दिले जाणार असून त्यामध्ये रिक्षाचालक, सायकल दुरुस्ती दुकान, भाजीविक्रेता, झेरॉक्स दुकानदार, मेडिकल स्टोअर, ग्रामीण भागातील कृषी उपयोगी वस्तू केंद्र अशा छोटय़ा उद्योगांचा समावेश आहे. समाजातील प्रत्येक नागरिकाची आर्थिक सुरक्षितता ही केंद्र सरकारची प्राथमिकता असून त्यासाठीच केंद्रातर्फे अशा विविध योजना राबविण्यात येत आहेत.
या योजनेविषयी माहिती देताना मुरली कृष्ण म्हणाले,‘ शिशु गटास ५० हजार रुपये, किशोर गटासाठी ५० हजार ते ५ लाख रुपये आणि तरुण गटासाठी ५ लाख ते १० लाख रुपये अशा तीन टप्प्यांमध्ये हे कर्ज उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ओळखीचा आणि निवासाचा पुरावा, कोणत्याही बँकेचा कर्जदार नसणे, आपल्या व्यवसायाचे शासनमान्य नोंदणी प्रमाणपत्र या गोष्टींची पूर्तता करून जवळच्या राष्ट्रीय, खासगी, ग्रामीण किंवा सहकारी बँकेत संपर्क साधणे आवश्यक आहे.’
सचिन भगत आणि महेंद्र गलांडे यांनी मनोगत व्यक्त केले. अशोक तायडे यांनी आभार मानले.