‘रोजचे तास. अभ्यास. प्रॅक्टिकल्स याच्या टेन्शनमध्ये असलेल्या फग्र्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाद्यांवर ताल धरला होता.. फग्र्युसन महाविद्यालयामधील अभ्यासू वातावरण बुधवारी पुरते बदलून गेले होते. एखाद्या लग्नघरात असावी अशी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होती. निमित्त होते ‘मुक्तछंद’ या वार्षिक महोत्सवाचे.
फग्र्युसन महाविद्यालयाच्यावतीने दरवर्षी मुक्तछंदचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाचे सर्व आयोजन विद्यार्थीच करतात. या वर्षीही विद्यार्थ्यांनी उत्साहात मुक्तछंद आयोजित केला आहे. पारंपरिक वाद्यांचे सादरीकरण .. विद्यार्थ्यांचा जल्लोष, महोत्सव छान होण्यासाठी धावपळ, सगळं छान होईल ना याचं थोडंसं टेन्शन. अशा वातावरणात ‘मुक्तछंद’ची बुधवारी सुरुवात झाली. सजावटीवर शेवटचा हात फिरवणे, प्रायोजकांचे फलक नीट लागले आहेत की नाही ते पाहणे, सगळे स्वयंसेवक, विविध समित्यांचे प्रमुख यांची धावपळ सुरू होती.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या वेळी फग्र्युसनचीच विद्यार्थिनी कौमुदी वेळुकर हिने मृणाल कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांच्याच शैलीत उत्तरे देत मृणालनेही विद्यार्थ्यांची मने जिंकली. ‘आपल्या मार्गात अडचण उभी राहू न देणे, त्यासाठी आवश्यक तेवढय़ा सावधपणाने पुढे जाणे हेच खरे कौशल्य आहे. मात्र, तरीही अडचणी उभ्या राहिल्याच तर त्याकडे संधी म्हणून पाहा आणि त्याला धैर्याने सामोरे जा,’ असा सल्ला मृणालने विद्यार्थ्यांना दिला.
महोत्सवाच्या औपचारिक उद्घाटनापूर्वी कोल्हापूर येथून आलेला तुतारी, टिमकी अशा पारंपरिक वाद्ये वाजवणाऱ्यांचा ताफ्यावर विद्यार्थ्यांनी ताल धरला. औपचारिक उद्घाटनाला फग्र्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी, सांस्कृतिक विभागप्रमुख सुशीलकुमार धनमाने आदी उपस्थित होते.