लोकसभेच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागल्यामुळे राजकीय पक्षांमध्येही आता अंतर्गत घडामोडींना सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या  शहर संघटनमंत्री या पदावरून गडकरी समर्थक श्रीकांत भारतीय यांना हलवण्यात आले असून त्यांच्या जागी मुंडे गटाचे रवी अनासपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय यांच्याकडे मुंबईतील निवडणूक आघाडीची जबाबदारी देण्यात आली आहे.
मूळचे नागपूरचे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून पुढे राजकारणात आलेले श्रीकांत भारतीय गेली आठ वर्षे शहर संघटनमंत्री म्हणून पुण्यात काम करत होते. गडकरी समर्थक अशीच त्यांची ओळख होती. पक्षातील गटबाजी कमी करण्यात मात्र त्यांना यश आले नाही. त्यांच्या जागी आता अनासपुरे यांची नियुक्ती झाली आहे. अनासपुरे पुण्यातील कार्यकर्ते असून ते प्रथम खासदार प्रकाश जावडेकर यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहात होते. त्यानंतर पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्वीय सहायक म्हणूनही त्यांनी काम केले. सध्या ते प्रदेश पदाधिकारी आहेत.
लोकसभा निवडणुकांसाठी पुण्यातून कोणाला उमेदवारी द्यावी याचा आढावा व मुलाखती घेण्यासाठी गेल्या पंधरवडय़ात भाजपचे निरीक्षक पुण्यात येऊन गेले. त्या वेळी उमेदवारीबाबत अन्य पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पुण्यातून शहराध्यक्ष अनिल शिरोळे आणि आमदार गिरीश बापट ही दोनच नावे प्रमुखपणे चर्चेत असल्याचे त्या वेळी पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले होते. पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर हेही पुण्यातून इच्छुक आहेत. उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी पक्षाने सर्व मतदारसंघात प्रक्रिया सुरू केली असून भारतीय जनता पक्ष ज्या जागा लढवणार आहे त्यातील अपवादात्मक दोन-तीन जागा वगळता अन्य सर्व उमेदवार २८ फेब्रुवारीपर्यंत जाहीर केले जाणार आहेत.
पुण्यातून कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरू असतानाच अनासपुरे यांची नियुक्ती झाली असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारतीय यांना हलवून मुंडे समर्थक अनासपुरे यांच्याकडे संघटनमंत्री हे महत्त्वाचे पद सोपवण्यात आल्यामुळे पुढील संकेत स्पष्ट असल्याची चर्चा पक्षात आहे. पक्षाने निवडणूक तयारी आणि अन्य विषयांसाठी एक गट स्थापन केला आहे. त्या गटात भारतीय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ते आता मुंबईतून हे काम करतील. आगामी निवडणुकांची महाराष्ट्राची जबाबदारी मुंडे यांच्याकडेच आहे. त्यामुळे पुण्यात झालेली अनासपुरे यांची नियुक्ती हा मुंडे समर्थकांना उत्साह देणारा निर्णय ठरला आहे.