पुणे : अनैतिक संबंधातून नात्यातील महिलेला त्रास दिल्याने मुंबईतील एका व्यावसायिकाचा खून करुन मृतदेह ताम्हिणी घाटात टाकून दिल्याचे उघडकीस आले. खून केल्यानंतर गोव्याला पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना खंडणी विरोधी पथकाने खेड शिवापूर परिसरातून अटक केली.

ज्यो मॅन्युअल परेरा (रा. कलिना, मुंबई) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अशोक महादेव थोरात (वय ३५, सध्या रा. एनडीए रस्ता, वारजे, मूळ रा. आष्टी, जि. बीड), गणेश साहेबराव रहाटे (वय ३५, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, मूळ रा. अकोले, जि. अहमदनगर), धीरज उर्फ बंटी लक्ष्मण साळुंके (वय ४०, रा. हरकानगर, भवानी पेठ), योगेश दत्तू माने (वय ४०, रा. वारजे माळवाडी) अशी अटक करण्यात आले्लयांची नावे आहे. माने महापालिकेच्या आरोग्य विभागात कर्मचारी आहे. साळुंके सराईत असून, त्याच्याविरुद्ध खून, अपहरण, खंडणी, मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा – पुणे विद्यापीठाच्या एमबीए अभ्यासक्रमाचा पेपर फुटला, ‘या’ विषयाची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय

ज्यो परेरा याचे आरोपी माने याच्या नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबध होते. परेरा आणि महिला एकत्र राहत होते. परेरा नात्यातील महिलेला त्रास देत होता. महिलेने याबाबतची मााहिती मानेला दिली होती. २० डिसेंबर रोजी माने साथीदारांसोबत मुंबईला गेला. तेथे त्यांचा परेराशी वाद झाला. माने आणि साथीदारांनी त्याच्या डोक्यात शस्त्राने वार केले. परेराचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी घाबरले.

मुंबईत मृतदेह टाकून दिला तर पोलीस पकडतील, अशी भिती वाटल्याने आरोपी मोटारीत मृतदेह घेऊन मुळशी तालुक्यात आले. ताम्हिणी घाट परिसरात मृतदेह टाकून आरोपी पसार झाले. खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांना याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी गोव्याला पसार हाेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने खेड शिवापूर परिसरात सापळा लावून आरोपींना अटक केली. आरोपींकडूना मोटार जप्त करण्यात आली.

हेही वाचा – कौतुकास्पद ! बाल गुन्हेगारीपासून परावृत्त होण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस देत आहेत फुटबॉलचे प्रशिक्षण

अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, श्रीकांत चव्हाण, सुरेंद्र जगदाळे, इश्वर आंधळे, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, विजय गुरव, प्रदीप शितोळे, शंकर संपत्ते यांनी ही कामगिरी केली.