पत्नीने माहेरून येण्यास नकार दिल्यामुळे पतीने स्वत:च्या पाच वर्षांच्या चिमुकल्याच्या गळ्यावर ब्लेडने वार केले व त्यानंतर स्वत:वरही ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हडपसरजवळील फुरसुंगी येथील विष्णू विनायक कॉलनी येथे शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रामंचद्र श्रीमंत कांबळे (वय पाच वर्षे, रा. फुरसुंगी, हडपसर) असे जखमी मुलाचे नाव आहे. त्याच्यावर वार केल्याच्या आरोपावरून श्रीमंत सिद्धप्पा कांबळे (वय २७) या पित्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रामचंद्रची आई रेश्मा (वय २३, रा. मार्केट यार्ड) हिने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमंत व रेश्मा यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. लग्नानंतर त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू झाले. त्यानंतर पत्नी लहान मुलीला घेऊन माहेरी राहात होती. सासरी ये, अन्यथा मुलाला मारून टाकीन आणि स्वत: आत्महत्या करीन, असे कांबळे हा पत्नीला म्हणत होता. माहेरून न आल्यामुळे कांबळे याने पाच वर्षांच्या रामचंद्रच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. त्यानंतर स्वत:च्या गळ्यावर वार करून घेतले. यामध्ये रामचंद्र व कांबळे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. गोरे हे अधिक तपास करत आहेत.