आखाती देशातील निर्यातीमुळे नववर्षांच्या तोंडावर सामिष खवय्यांचा हिरमोड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल खळदकर, पुणे</strong>

मटण दरवाढीवरून कोल्हापुरात झालेल्या जनआंदोलनामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले असताना पुण्यातही मटणाच्या दरात टप्याटप्प्याने वाढ होत आहे. रविवारी प्रतिकिलो मटणाच्या दरात वीस रुपयांनी वाढ होऊन मटणाचा दर ६०० रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचला. नववर्षांच्या तोंडावर झालेल्या मटण दरवाढीमुळे सामिष खवय्यांचा हिरमोड झाला आहे.

मटणाच्या दरात होणाऱ्या वाढीमागची कारणे वेगवेगळी आहेत. अवेळी झालेला पाऊस तसेच गेल्या तीन आठवडय़ात आखाती देशात दहा हजार बकरे शेतीमाल निर्यात करणाऱ्या कंपनीने नाशिक येथील विमानतळावरून विक्रीसाठी पाठविले. त्यामुळे राज्यातील बाजारपेठेत शेळी, मेंढय़ांचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी बक ऱ्यांच्या दरात वाढ झाली असल्याचे निरीक्षण पुणे शहर मटण विक्रेता संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना नोंदविले.

नाशिक जिल्ह्य़ातील पिंपळगाव, मालेगाव, सायखेडा, सटाणा, साखरी येथील स्थानिक मेंढपाळ तसेच व्यापाऱ्यांकडून नाशिक येथील दोन-तीन निर्यातदार कंपन्याकडून मोठय़ा प्रमाणावर बक ऱ्यांची खरेदी करण्यात आली. गेल्या तीन आठवडय़ात नाशिक येथील विमानतळावरून दहा हजार बकरे आखाती देशातील शारजा, अबुधाबी तसेच अन्य भागात विक्रीसाठी पाठविण्यात आले. या कंपन्यांकडून परदेशात शेतीमाल निर्यात केला जातो. मात्र, यंदा या कंपन्यांनी थेट जिवंत बकरे खरेदी करून ते कागरे विमानांनी आखाती देशात पाठविले. त्यामुळे बाजारात बकऱ्यांचा तुटवडा निर्माण झाल्याचेही कांबळे यांनी सांगितले.

दक्षिणेकडील राज्यांपैकी आंध्रप्रदेश, तामिळनाडू तसेच पश्चिम बंगालमधील कोलाकाता भागातील व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातून बकरे खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. परराज्यात मटणाचे किलोचे दर ७०० ते ७४० रुपयांपर्यंत आहेत. त्यामुळे परराज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील बकरे स्वस्त आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरेतील बक ऱ्यांपेक्षा महाराष्ट्रातील बकऱ्यांचे मांस चांगले असते. त्यामुळे परराज्यातील व्यापारी महाराष्ट्रातील बाजारपेठेतून मोठय़ा प्रमाणावर खरेदी करत आहेत. तेथे मटणाचे दर जास्त आहेत. त्यामुळे दहा किलोच्या एका बक ऱ्याला परराज्यातील व्यापारी जादा किंमत मोजून खरेदी करत असून परराज्यातील मटणापेक्षा महाराष्ट्रातील मटणाचे दर कमी आहेत. मेंढपाळ तसेच व्यापाऱ्यांना परराज्यातील व्यापारी जादा पैसे देत आहेत. महाराष्ट्रातील मटण विक्रेत्यांना जादा पैसे मोजणे परवडत नाही. त्यामुळे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी महाराष्ट्रातील व्यापारी तसेच मटण विक्रेत्यांना जादा दर मोजून बकरे खरेदी करावे लागत आहे, अशीही माहिती कांबळे यांनी दिली.

मुंबईतील देवनार तसेच औरंगाबाद येथील कत्तलखान्यातून आखाती देशात हवाबंद मटण विक्रीसाठी पाठविले जायचे. यंदा मात्र थेट विमानांनी जिवंत बक रे विक्रीसाठी पाठविण्यात आले आहेत. साहजिकच आखाती देशात पाठविण्यात आलेल्या बक ऱ्यांना जादा पैसे मिळत असल्याने मेंढपाळांनी बकरे थेट कंपन्यांना विकले, असेही त्यांनी नमूद केले.

अवेळी पावसाचा फटका

बक ऱ्यांचे मुख्य अन्न चारा आहे. अवेळी झालेल्या पावसामुळे ओला चारा खाणाऱ्या शेळी, मेंढय़ांच्या वाढीवर परिणाम झाला. ओला चाऱ्यामुळे त्यांचे वजन वाढले नाही. थंडीत बकऱ्यांना सुका चारा दिला जातो. साधारण संक्रांतीनंतर नवीन बकरे बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येतात. यंदा मात्र मार्गशीर्ष महिन्यात कमी वजनाच्या बक ऱ्यांची विक्री झाली. मागणी आणि पुरवठा याचा समतोल बिघडला. बकऱ्यांचे संगोपन करणे जिकिरिचे असते. घाटावरील मेंढपाळ कोकणात बकऱ्या घेऊन जातात. नैसर्गिक वातावरणात बक ऱ्यांची वाढ उत्तम होते. यंदा अवेळी झालेल्या पावसामुळे बक ऱ्यांच्या वाढीवर परिणाम झाला, असे विक्रेत्यांनी सांगितले.

मटण दरवाढीवरून किरकोळ विक्रेत्यांवर दबाब आणण्याचा प्रकार कोल्हापुरात झाला. वास्ताविक शासनाने परराज्यातील बकरे खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बंधने टाकायला हवीत. परराज्यातील व्यापाऱ्यांना बकरे खरेदी करण्यास मनाई केली पाहिजे. नवीन सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे. याबाबत पुण्यातील मटण विक्रेत्यांची बैठक २ जानेवारीला भवानी पेठेतील लक्ष्मी बाजार येथे आयोजित करण्यात येणार आहे.

– प्रभाकर कांबळे, अध्यक्ष,  पुणे शहर मटण विक्रेता संघटना

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mutton prices in pune city touch rs 600 per kg zws
First published on: 31-12-2019 at 03:43 IST