पुणे : झंकारणाऱ्या सतारवादनाने मंत्रमुग्ध होण्याचा ‘अमृत’योग रसिकांनी रविवारच्या सकाळी अनुभवला. शिष्यांनी आयोजित केलेल्या सत्काराला आपल्या वादनातून उत्तर देत जया जोग यांनी स्वर-लयीची नक्षी साकारत अद्वैताचा आनंद दिला. प्रसिद्ध सतारवादक जया जोग यांच्या अमृतमहोत्सवी वर्षातील पदार्पणानिमित्त आयोजित ‘नक्षी स्वर लयीची…’ या विशेष कार्यक्रमात ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांच्या हस्ते जोग यांचा सत्कार करण्यात आला. प्रसिद्ध व्हायोलिनवादक डॉ. नीलिमा राडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. ज्येष्ठ व्हायोलिनवादक विद्या डेंगळे, ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यगुरू डॉ. सुचेता भिडे-चापेकर, संगीतगुरू डाॅ. माधुरी डोंगरे, अभिनेत्री भाग्यश्री देसाई या वेळी उपस्थित होत्या.

जोग म्हणाल्या, ‘घरामध्ये संगीताची पार्श्वभूमी नसताना उस्ताद उस्मान खाँ यांच्यासारख्या गुरूंमुळे वयाच्या तिशीनंतर जिद्द आणि परिश्रमांची तयारी या गुणांमुळे मी सतारवादन शिकले. स्वतःची मेहनत दाखविण्यासाठी राग वापरायचा नाही, हे गुरुवचन समजून घेत रागभावाचा विचार मी प्रस्तुतीमध्ये यथाशक्ती करण्याचा प्रयत्न केला. माझ्या रचना त्यातूनच निर्माण झाल्या. परमेश्वरी कृपा आणि गुरूंचे आशीर्वाद, यातूनच हा प्रवास शक्य झाला.’

जयाताईंचे सांगीतिक व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे ज्ञानदानाचे कार्य अविरत सुरू राहावे, अशा शुभेच्छा राडकर यांनी दिल्या. जोग यांच्यासमवेत अनाम प्रेम संस्थेच्या माध्यमातून केलेल्या एकत्रित संगीतकार्याच्या आठवणींना गिंडे यांनी उजाळा दिला. शिष्यांच्या वतीने राहुल पंडित यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करताना जयाताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तरार्धात जया जोग यांच्या शिष्यांचे समूह सतारवादन झाले. प्रज्ञा मेने, मानसी दांडेकर, स्वाती घैसास, सुचेता गोसावी, बीना लिमकर, रिशान कुळकर्णी या शिष्यांनी जयाताईंच्या स्वतंत्र रचनांचे सादरीकरण केले. समर्पण (राग तोडी, ताल रूपक), महिरप (राग भैरव, ताल एकताल) आणि इंद्रधनू या रचनांचा त्यात समावेश होता. त्यांना भावना टिकले यांनी तबल्याची साथ केली. त्यानंतर प्रज्ञा मेने आणि व्हायोलिनवादक दीपा कुडतरकर यांनी सहवादनातून ‘अहिरभैरव’ रागामधील नैवेद्य ही त्रितालातील रचना सादर केली. जया जोग यांच्या सतारवादनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांनी ‘नटभैरव’ रागामधील झपताल व त्रिताल यांच्या मिश्रणातून ‘हिंदोळा’ ही रचना सादर केली. अद्वैत ही भैरवी रचना सादर करून त्यांनी समारोप केला. त्यांना अभिजित बारटक्के यांनी तबल्याची साथ केली. निखिल दाते यांनी आभार मानले. रंजना काळे यांनी सूत्रसंचालन केले.