पुणे : गिरणगावात तिसऱ्या भोंग्याचा आवाज कानावर पडताच जागी होणारी कामगार वस्ती. त्या वस्तीतल्या लोकांसाठी रोजीरोटीचा रोजचा सवाल विचारणारे नारायण सुर्वे आणि त्यांची अनुभवातून पीळदार झालेली ‘कामगार नावाची गोष्ट’ शुक्रवारी पुणेकरांना अनुभवता आली. सुर्वे यांच्या कवितांमधून उलगडलेले कामगार, कष्टकरी आणि वंचितांच्या जगाचा प्रत्यय सर्वांना आला. साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वतीने ज्येष्ठ कवयित्री पद्मा गोळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘सुर्वे मास्तरांचे विद्यापीठ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या अध्यक्षा अंजली कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या संहितेचे लेखन केले होते. त्यांच्यासह मृणालिनी कानिटकर-जोशी, आश्लेषा महाजन, सुजाता पवार यांनी कवितांचे सादरीकरण केले. डाॅ. नीलिमा गुंडी यांनी कलाकारांचे स्वागत केले.

कुलकर्णी म्हणाल्या, ‘नारायण सुर्वे यांनी साठच्या दशकात कविता करायला सुरुवात केली. त्यांच्या कवितांमधून दुसऱ्या महायुद्धानंतर अवतरलेले यंत्रयुग आणि त्यातले संदर्भ सहजपणे व्यक्त झाले. मराठी कवितेला कामगारांच्या जगणे दाखवणारे सुर्वे मास्तर गिरणगावात वाढले. तोच जिवंत अनुभव त्यांच्या कवितेत साकार झालेला दिसतो. जन्मदात्यांनी त्याग करून कचऱ्याच्या पेटीजवळ टाकून दिले. मात्र, गंगाराम सुर्वे यांनी या मुलाला वाढवले, स्वत:चे नाव दिले. पुढे तो आधारही गेल्यावर नारायण सुर्वे यांनी गिरणगावच्या विद्यापीठात जगण्याचे शिक्षण घेतले. फलकांवरची भाषा वाचून विद्रोहाचा शब्द गिरवला. साठोत्तरी कवितेत त्यांना हाच शब्द ठळकपणे लिहिला.’

‘‘ऐसा गा मी ब्रह्म’ या कवितासंग्रहाने मराठी कवितेत खऱ्या अर्थाने ‘नारायणाचा सूर्योदय’ झाला होता. त्यानंतर सुर्व्यांनी रोजच्या जगण्यातले शब्द, अनुभवांचे शहाणपण मराठी कवितेला दिले. याकूब नालबंदवाला, शिगवाला, चंद्रा नायकीण अशी कितीतरी पात्रे सुर्व्यांनी कवितेतून जिवंत केली. त्यायोगे त्यांनी मराठी कवितेला नवे अनुभवविश्व दिले. त्यांच्या कवितेतला जीवनानुभव सच्चा आहे. त्याची भाषाही तशीच सच्ची आहे,’ असे कुलकर्णी यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘डोंगरी शेत माझं ग मी बेनू किती’, ‘माझे विद्यापीठ’, ‘असं पत्रात लिव्हा’, ‘गिरणीची लावणी’, ‘माझी आई’, ‘नेहरू गेले तेव्हाची गोष्ट’, ‘कार्ल मार्क्स’ या कवितांचे सादरीकरण करण्यात आले. ‘ऐसा गा मी ब्रह्म’ या कवितेने कार्यक्रमाचा समारोप झाला. चिन्मयी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले.