राज्यातील ७ हजार ३३० शाळांमध्ये चाचणी

पुणे : राज्यातील ७ हजार ३३० शाळांतील राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाअंतर्गत (नॅशनल अचीव्हमेंट सव्र्हे) चाचणी १२ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या मिळून २ लाख ३४ हजार ५५ विद्यार्थ्यांचा या सर्वेक्षणात समावेश असून, यासाठी विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती राहण्याची दक्षता घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) शाळांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. यापूर्वी २०१७-१८ मध्ये तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामुळे तीन वर्षांनी पुन्हा हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

 सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळा १२ नोव्हेंबरला सकाळी साडेसात वाजता सुरू कराव्यात. या दिवशी शाळेत स्नेहसंमेलन, क्रीडा दिन, सांस्कृतिक कार्यक्रमांसारखे कोणतेही कार्यक्रम करू नयेत. एका बाकावर एक विद्यार्थी बसवावा, बाके उपलब्ध नसल्यास स्वच्छ चटई वापरून पुरेसे अंतर राखण्यात यावे. चाचणीसाठी निवडलेल्या शाळेचे, माध्यम आणि इयत्तानिहाय वर्गाच्या एकापेक्षा जास्त तुकड्या असल्यास सर्व तुकड्यांतील विद्यार्थी उपस्थित असावेत. या विद्यार्थ्यांतून एक तुकडी यादृच्छिक पद्धतीने क्षेत्रित अन्वेषकांमार्फत निवडली जाईल. संपादणूक चाचणी सोडवण्यासाठी तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी साडेदहा ते बारा, पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी साडेदहा ते साडेबारा अशी वेळ देण्यात आली आहे. सर्वेक्षणातील शाळांतील माध्यमनिहाय, इयत्तानिहाय शिकवणारे सर्व विषयांचे शिक्षक शाळेत उपस्थित असणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

होणार काय?…सर्वेक्षणासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील शासकीय, खासगी, अनुदानित, स्वयंअर्थसाहाय्यित मिळून तिसरीच्या  १ हजार ६३१, पाचवीच्या १ हजार ५५९, आठवीच्या २ हजार ६४१ आणि दहावीच्या २ हजार ८०१ शाळांचा समावेश आहे. चाचणीमध्ये भाषा, गणित, परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र, विज्ञान या विषयांच्या चार प्रश्नसंचात ४७ प्रश्न समाविष्ट असतील. सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकारी स्वतंत्र निरीक्षक म्हणून काम करणार आहेत.

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण म्हणजे?

विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीतील संपादणुकीचे मूल्यांकन करणे, देशातील शिक्षण प्रक्रियेच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण करण्यात येते. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन पातळ्यांवर ही सर्वेक्षण चाचणी घेतली जाते. सर्वेक्षणातील शाळा यादृच्छिक नमुना (रँडम सॅम्र्पंलग) पद्धतीने निवडण्यात आल्या आहेत. हे सर्वेक्षण देशभरात एकाच दिवशी होणार आहे.

दिवाळीच्या सुट्टीबाबत असमानता

पुणे : राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांना देण्यात आलेल्या दिवाळी सुट्टीचा गोंधळ अजूनही सुरू असून प्रत्येक जिल्ह्यांनुसार काढण्यात आलेल्या वेगवेगळ्या पत्रकांमुळे सुट्टीबाबत असमानता निर्माण झाल्याचे चित्र आहे.राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणामध्ये सहभागी असलेल्या मुंबईतील शाळा गुरूवारी सुरू होणार असून चाचणी झाल्यानंतर या शाळांना पुन्हा सुट्टी देण्यात येणार आहे तर इतर शाळांना २० नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

लोकलने प्रवासाची मुभा 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील निवडलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर १२ नोव्हेंबरला या सर्वेक्षणासाठी म्हणून संबंधित विद्यार्थ्यांना लोकल प्रवास करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. या विद्यार्थ्यांसोबत असलेल्या व्यक्तीच्या करोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.