खास पु.ल. शैलीतला विनोद आणि सुश्राव्य संगीताने नटलेल्या ‘गुळाचा गणपती’ या चित्रपटाची संहिता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला मिळाली आहे. विशेष हे, की ही संहिता पु. ल. देशपांडे यांनी स्वहस्ताक्षरात लिहिली असून जवळपास पासष्ट वर्षांनंतरही ती उत्तम अवस्थेत आहे.
१९५३ मध्ये हा चित्रपट बनवला गेला असून निर्माते विनायक राजगुरू यांनी त्याची निर्मिती केली होती. राजगुरू यांच्या पत्नी डॉ. सरोजिनी राजगुरू यांनी मंगळवारी एनएफएआयला भेट देऊन एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांच्या हाती त्याची संहिता सुपूर्द केली. विनायक राजगुरू यांचे भाऊ दिलीप राजगुरू, चित्रपट अभ्यासक डॉ. सतीश जकातदार या वेळी उपस्थित होते.
सुमारे ९० पानांची ही संहिता पुलंनी १९५१ मध्ये लिहिल्याचे सांगितले जाते. या हस्तलिखितात लिखाणाच्या बाजूला त्यांनी चित्रपटासाठीच्या काही सूचनाही लिहून ठेवल्या आहेत. यामुळे ही संहिता चित्रपट अभ्यासकांसाठी संदर्भ म्हणून महत्त्वाची ठरेल, असे मगदूम यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘चित्रपटसृष्टीशी संबंधित जुने छायाचित्रण, संहिता, छायाचित्रे ज्यांच्याकडे आहेत त्यांनी ती जतनासाठी एनएफएआयकडे द्यावी, असे आवाहन आम्ही काही महिन्यांपासून करत आहोत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटांचा जुना ठेवा देण्यासाठी लोक पुढे येत आहेत. पुलंच्या या संहितेचे स्कॅनिंग करून ‘डिजिटल’ स्वरूपात रूपांतर केले जाणार असून त्यानंतर चित्रपट अभ्यासकांना ती पाहता येईल.’
सबकुछ पुलं!
‘गुळाचा गणपती’ या चित्रपटाबाबत पु. ल. देशपांडे यांनी विविध भूमिका वठवल्या होत्या. लेखक, दिग्दर्शक, संगीतकार आणि अभिनेतेही पु.ल. असा हा ‘सबकुछ पुलं’ चित्रपट होता. यावर पुलंनी स्वत:च ‘प्रेक्षकही पुलंच ठरू नयेत म्हणजे झालं!’ अशा केलेल्या विनोदाचा किस्सा सांगितला जातो. या चित्रपटातली पुलंची वेंधळ्या ‘नाऱ्या’ची व्यक्तिरेखा चित्रपट रसिकांनी उचलून धरली. तर नायिकेची ‘लीला’ची भूमिका अभिनेत्री चित्रा यांनी निभावली होती. या चित्रपटातील पं. भीमसेन जोशी यांनी गायलेले ‘इंद्रायणी काठी’ आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि पं. वसंतराव देशपांडे यांनी गायलेले ‘इथेच टाका तंबू’, ‘ही कुणी छेडिली तार’ ही गीते प्रचंड लोकप्रिय झाली. गीतकार ग. दि. माडगूळकर यांनी ही गीते लिहिली होती.