पुणे : खराडी परिसरातील कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना ‘डिजिटल’ अटक करण्याची भीती दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात पसार झालेल्या काॅल सेंटर चालकासह तीन साथीदारांचा शोध घेण्यात येत असून, याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी नवी मुंबईत छापे टाकले. करण शेखावत (रा. अहमदाबाद), संजय मोरे आणि केतन गव्हाणे हे तिघे पसार झाले आहेत. करण शेखावत हा सूत्रधार असल्याचे तपासात उघडकीस आले. पसार आरोपींचा शोध घेण्याची जबाबदारी गुन्हे शाखेच्या युनिट चारकडे सोपविण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने रविवारी नवी मुंबईत छापे टाकले. मात्र, आराेपी सापडले नाहीत, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
खराडी- मुंढवा रस्त्यावरील प्राइड आयकॉन या इमारतीच्या नवव्या मजल्यावर ‘मॅग्नटेल बीपीएस अँड कन्सल्टंट’ या नावाने हे कॉल सेंटर सुरू होते. या कॉल सेंटरमध्ये १२३ कर्मचारी काम करीत होते. त्यांच्याकडे दररोज सुमारे एक लाख अमेरिकन नागरिकांचा डेटा देण्यात येत होता. ‘तुमच्या खात्यातून अमली पदार्थ खरेदी व्यवहार झाले आहेत, तुम्हाला पोलिसांकडून अटक केली जाऊ शकते,’ अशी भीती घालून ३० ते ४० हजार डॉलर्स (सुमारे ३२ ते ३३ लाख रुपये) अमेरिकन नागरिकांकडून उकळले जात होते. हा पैसा हवालाच्या माध्यमातून देशात येत असल्याचेही पोलीस तपासात उघडकीस आले. सायबर गुन्हे शाखा, तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री तेथे छापा टाकला. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. अटक केलेले आरोपी गुजरात, राजस्थान या राज्यांतील असून, बहुतांश कर्मचारी परराज्यांतील आहेत.
या कॉल सेंटरमधील कर्मचारी अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधून त्यांना बँक खात्यांशी संबंधित समस्या सांगून किंवा तुमच्या खात्यातून ड्रग्जचे व्यवहार झाले असून तुम्हाला अटक होऊ शकते, अशी भीती घालून ‘डिजिटल अरेस्ट’ची बतावणी करायचे. त्यानंतर यांपासून बचावासाठी क्रिप्टो करन्सी किंवा गिफ्ट व्हाउचर्सच्या स्वरूपात त्यांच्याकडून पैसे उकळायचे. त्यांची महिन्याला ७ ते ८ कोटींची उलाढाल असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. या कॉल सेंटरमध्ये अमेरिकन वेळेनुसार सायंकाळी ६ ते रात्री २ पर्यंत काम चालायचे. पोलिसांनी ६४ लॅपटॉप, ४१ मोबाइल, ४ राउटर जप्त केले आहेत. कर्मचाऱ्यांना फोन करण्यासाठी दिली जाणारी एक लाख जणांची यादी नेमकी कुठून आणि कशी येत होती, फसवणुकीनंतर मिळणारे पैसे देशात कसे येत होते, याबाबत गुुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे.
 
  
  
  
  
  
 