महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी सहकारात राजकारण नसलं पाहिजं असं सांगितलं आहे. हे अनास्कर यांनी बरोबर ओळखलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं तरी अनास्कर आहेतच, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी अनास्कर आहेतच, शरद पवार यांच्याकडे विभाग आला तरी अनास्कर आहेतच, असं असलं पाहिजे. कोणाचंही सरकार आलं, तरी एवढी विश्वासार्हता असली पाहिजे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचा ‘राज्य शिखर प्रशिक्षण केंद्र’ उद्घाटन आणि उत्कृष्ट नागरी बँकांच्या सत्कार समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते, उपाध्यक्ष साहेबराव टकले, मानद सचिव संगीता कांकरिया आणि संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते.

यावेळी अजित पवार म्हणाले की, “बँकेचं काम करत असताना मी अनास्करांना नेहमी सांगत असतो की मी सांगितलेलं योग्य नसेल तर ऐकायचं नाही. कारण कधी कधी काही शिष्टमंडळ आमच्याकडे येतात. दादा आम्हाला पैसे देण्यास सांगा ना, आमची संस्था अशी-तशी आहे. त्यामुळे आम्ही सर्व नियम पाहून काम करत असतो आणि निर्णय घेत असतो”.

पुढे म्हणाले की, “आपल्या देशात राष्ट्रीयकृत बँका आहेत. खासगी बँका मोठ्या प्रमाणावर आलेल्या आहेत. परदेशी बँकादेखील आहेत. यामध्ये काही आर्थिक संस्था आणि आपल्या नागरी संस्थादेखील काम करत आहेत. पण मी बर्‍याच वेळा पाहतो की सहकारी तत्वावर चालणार्‍या बँकाबद्दल बदनामी केली जाते. यामुळे समाजात एक मत होऊन जातं. ही चुका करणारी माणसं आहेत. काही तरी वेडंवाकडं करणारी माणसं आहेत, अशी भावना होत असते”.

“मध्यंतरी देशातील नागरी सहकारी बँकामध्ये २२० कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आली. मात्र वास्तविक तशी परिस्थिती नाही. २०१८ आणि २०१९ मध्ये देशभरात नागरी सहकारी बँकामध्ये १८१ घोटाळे झाले आहेत. १२७ कोटी ७० लाख अशी रक्कम होती. १०० टक्क्यांमध्ये काढायचं झालं तर पाव टक्का देखील ती रक्कम नव्हती. मी याचं समर्थन करत नाही,” असं अजित पवार म्हणाले.

काही वर्षांपूर्वी असं वातावरण तयार करण्यात आलं की, राज्य सहकारी बँक अतिशय चुकीच्या पद्धतीने काम करीत आहे. इतका भ्रष्टाचार झालेला आहे. कारखाने कमी किंमतीत विकले गेले आहेत अशी चर्चा होती आणि त्यावर अनेक तपास यंत्रणांमार्फत चौकशा झाल्या आहेत. त्यामध्ये काहीही तथ्य निघाले नाही. तसंच महाराष्ट्र सहकारी बँकेवर प्रशासक म्हणून बाळासाहेब अनास्कर काम पाहत आहेत. आज आम्ही तिथे निवडणुका लावू शकतो. नवीन बोर्ड तिथे येऊ शकते. आज १४०० कोटींचा ढोबळ नफा आहे. नफा ६०० कोटींहून अधिक आहे. असं काही महाराष्ट्रात दाखविले गेले की, या बँकेने काही तरी चुकीचे केले. सर्व वाट लागली आहे. पण यात एक तथ्य निघाले नसल्याचे सांगत त्यांनी वस्तुस्थिती मांडत विरोधकांना टोला लगावला.

“नागरी सहकारी बॅंकापेक्षा राष्ट्रीयकृत बँकामध्ये घोटाळे मोठ्या प्रमाणात आहेत. पण त्याचा बोभाटा केला जात नाही. वरच्या पातळीवर वरवरच चाललेलं असतं. इथं मात्र जरा खट झालं तर त्याची होती नव्हती तेवढी काढून टाकतात. तो व्यक्ती कुठे जात असेल तर लोक त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात बघत असतात. आपण बाहेर फिरावं की नाही असं वाटतं,” अशा प्रकारचं चित्र असल्याचं त्यांनी सांगितले.

“महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार चळवळीचं महत्वाचं योगदान आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील त्रुटी दूर करून सहकार चळवळ टिकविण्याचे आणि वाढविण्याचे प्रामाणिक प्रयत्न गरजेचं आहे. नागरी सहकारी बँकांसमोर अनेक आव्हानं असली तरी त्यावर मात करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. प्रशिक्षणामुळे बँकांना दैनंदिन कामकाजात चांगला फायदा होईल. मावळ तालुक्यातील नियोजित प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीसाठी शासकीय जागा देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल,” अशी माहित अजित पवारांनी दिली.