|| शिवाजी खांडेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक दिवसासाठी ‘सेल्फी’ कशाला घेता, पाच वर्ष मी तुम्हाला ‘सेल्फी’ काढण्यासाठी उपलब्ध होईन, त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत, अशी साद घालत आणि शिरूर मतदार संघाचा विकास करण्यासाठी साथ देण्याचे आवाहन करत राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रचार सुरू होता.

कुठे कोपरा सभा तर कुठे मतदारांना अभिवादन, प्रचारफेरीत महिलांकडून होणारे औक्षण, ठिकठिकाणी स्वागत, असे कार्यक्रम होत होते. सकाळी साडे नऊ वाजता सुरू झालेल्या,भोसरी मतदार संघातील मतदारांच्या गाठीभेटीच्या दौऱ्याची सांगता भोसरीतील दुचाकी फेरीने रात्री पावणेदहा वाजता झाली.

वेळ सकाळी नऊची. महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या भोसरी मतदार संघातील गाठीभेटींच्या नियोजित कार्यक्रमाची तयारी दिघी येथील माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके यांच्या घरी सुरू होती. कार्यकर्त्यांचीही लगबग सुरू होती. काही कार्यकर्ते पावभाजीवर ताव मारुन तयार होत होते. तेवढय़ात डॉ. कोल्हे यांचे आगमन झाले अन् उत्साही कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या जयजयकाराच्या घोषणांना सुरुवात केली. वेळ कमी असल्यामुळे आजी, माजी नगरसेवकांनी डॉ. कोल्हे यांना जमलेल्या गर्दीतून बाजूला काढले. नंतर महिला कार्यकर्त्यांनी औक्षण केले आणि नाश्ता करुन दिघीचे ग्रामदैवत काळभैरवनाथ आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन घेऊन पहिली कोपरा सभा पार पडली. गाठीभेटींचा कार्यक्रम सुरू झाल्यापासून आबालवृध्द अशा सर्वाना डॉ. कोल्हे यांच्याबरोबर ‘सेल्फी’ काढण्याचा मोह आवरत नव्हता. डॉ. कोल्हेही त्यांना नाराज करत नव्हते. ‘सेल्फी’च्या आग्रहामुळे गाठीभेटींच्या कार्यक्रमाला उशीर होत होता.

दिघी येथील काही सोसायटय़ांमधील मतदारांच्या भेटी घेत डॉ. कोल्हे यांच्या वाहनांचा ताफा दुपारी साडेबारा वाजता चऱ्होली येथील ताजणे मळ्यातील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दाखल झाला. तिथे उपस्थितांच्या भेटी घेऊन त्यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. तेथून थेट चऱ्होली बुद्रुक गाठले. दुपारी सव्वा वाजता चऱ्होली येथील मतदारांनी त्यांचे स्वागत करुन त्यांची गावातून घोडय़ावर बसवून वाघेश्वर मंदिरापर्यंत मिरवणूक काढली. मंदिरामध्ये चऱ्होली गावातील नागरिक मोठय़ा संख्येने जमले होते. तिथे सभा झाली. त्या कोपरा सभेत डॉ. कोल्हे यांना गावकऱ्यांकडून सुमारे दोन लाख रुपयांची भेट दिली गेली.

मतदार संघाच्या विकासात कुठेही कमी पडणार नाही. गेली पंधरा वर्षे खासदार म्हणून प्रतिनिधित्व करणाऱ्या आढळराव यांनी या भागाचा कोणताही विकास केला नाही. त्याची कसर भरुन काढण्याचे आश्वासन या वेळी बोलताना डॉ. कोल्हे यांनी गावकऱ्यांना दिले. तेथून डुडूळगाव, मोशी असा संपर्क दौरा करुन दुपारी तीन वाजता चिखली मोरे वस्ती येथील मतदारांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या आणि भोजनाचा कार्यक्रम उरकून घेतला. भोजन संपल्यानंतर निगडी ओटा स्किम येथील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन नेहरुनगर भोसरी येथून दुचाकी फेरीला सुरुवात झाली.

ही फेरी मासुळकर कॉलनी, गवळी माथा, चक्रपाणी वसाहत अशी फिरुन दिघी रोड येथे आल्यावर फेरीचा समारोप झाला. डॉ. कोल्हे यांच्या बरोबर महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, चंद्रकांत वाळके यांच्यासह त्या त्या भागातील आजी माजी नगरसेवक दिवसभर होते.

आमचे छायाचित्र काढा

दिघी येथून गाठीभेटींच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली, तेथपासून ते दौरा संपेपर्यंत डॉ. अमोल कोल्हे यांच्याबरोबर ‘सेल्फी’ काढण्यासाठी आबालवृद्धांची झुंबड उडत होती. चिखली येथे आल्यानंतर काही शाळकरी मुलांनी स्वाक्षरी देण्याचा आग्रह धरला. अनेकांनी तर चक्क माजी विलास लांडे यांच्याकडे मोबाइल देऊन डॉ. कोल्हे यांच्याबरोबर आमचे छायाचित्र काढा, असा आग्रह धरला. लांडे यांनीही मोबाइलमधून छायाचित्रे काढून दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp in pune
First published on: 26-04-2019 at 05:47 IST