पुणे : पुणे शहर आणि आसपासच्या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते खड्डेमय झाल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर आज स्वारगेट येथील पीएमटी कामगार संघटनेच्या कार्यालया समोरच्या रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.यावेळी रस्त्यावरील खड्ड्यात प्रतिकात्मक खेकडे,बदक, कागदी नाव सोडून महापालिका प्रशासन आणि भाजपाचा निषेध नोंदविण्यात आला.तसेच यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

हेही वाचा : Uddhav Thackeray vs Eknath Shinde in SC Live: १ ऑगस्टला पुढील सुनावणी, सुप्रीम कोर्टाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

“पुणे शहरात मागील पाच वर्षापासून महापालिकेमध्ये भाजपाची सत्ता होती.या काळात अनेक कामात भाजपाच्या नेत्यांनी भ्रष्टाचार केला आहे.त्यामुळेच पुणेकर नागरिकांना खड्डेमय रस्ते पाहण्याची वेळ आली आहे. शहरातील नागरिकांना चांगले रस्ते पाहिजे असतील.तर येणार्‍या निवडणुकीत भाजप मुक्त पुणे नागरिकांनी केले पाहिजे” अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी यावेळी दिली.

हेही वाचा : SC Hearing on OBC Reservation Live : सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणासाठी ट्रिपल टेस्ट महत्वाची : उल्हास बापट, वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

दरम्यान महापालिका प्रशासनाकडून 90 टक्के खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. हा दावा चुकीचा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी केला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्या खड्ड्यांचे प्रदर्शन आयोजित करणार असून पुणेकर नागरिकांनी त्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने केले.