राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असणारे विजयसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या व्यासपीठावर उपस्थिती लावली होती. त्यानंतर तब्बल सहा महिन्याच्या कालावधीनंतर आज पुण्यात एका जाहीर कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील एकमेकांसमोर आले. यावेळी दोघांमध्ये व्यासपीठावर जवळपास १५ मिनिटं चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दल कोणताही तपशील मिळू शकला नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोहोचण्यास उशीर होत असल्याने व्यासपीठावर नेत्यांमध्ये चर्चा सुरु होती. शरद पवार इतर नेत्यांसोबत गप्पा मारत असतानाच विजयसिंह मोहिते पाटील तिथे पोहोचले. यावेळी शरद पवार यांनी त्यांना समोरील खुर्चीवर बसण्यास सांगितलं. दोघांमध्ये यावेळी जवळपास १५ मिनिटं चर्चा सुरु होती. तर दुसरीकडे अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातही बराच वेळ चर्चा सुरु असल्याचं चित्र पहायला मिळालं.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४३ व्या वार्षिक सर्व साधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी शरद पवार पोहोचले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, नवनिर्वाचित आमदार रोहित पवार,  विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील तसेच साखर कारखानदार, ऊस उत्पादक शेतकरी यावेळी उपस्थित होते.