scorecardresearch

मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याच्या राणा दांपत्याच्या भूमिकेवर पवारांची जोरदार टीका, म्हणाले “तुमच्या घरी धार्मिक…”

महाराष्ट्रात असं कधी होत नव्हतं, शरद पवारांनी जाहीर केली नाराजी

राज्यात सध्या हनुमान चालिसावरुन जोरदार राजकारण रंगलं आहे. राणा दांपत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. यानंतर पोलिसांनी राणा दांपत्याला अटक केली असून किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्यानंतर दिल्लीपर्यंत हे प्रकरण पोहोचलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर स्पष्ट मत मांडलं आहे.

“एखाद्या धर्मासंबंधी, धर्माच्या विचारासंबंधी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या काही भावना असतात. पण त्या भावना त्यांनी अंतकरणात, घरात ठेवाव्यात. पण आपण त्याचं प्रदर्शन करु लागलो. त्याच्या आधारे अन्य घटकांसंबंधी एक प्रकारचा द्वेष वाढेल असे प्रयत्न केले तर त्याचे दुष्परिणाम समाजाला दिसू लागतात. महाराष्ट्रात असं कधी होत नव्हतं. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अशा वैयक्तिक अशा गोष्टी होत असून मला त्याचं आश्चर्य वाटतं,” असं शरद पवार म्हणाले.

“आमच्याविरोधातील एफआयआर रद्द करा”; राणा दांपत्याची हायकोर्टात धाव; तातडीने सुनावणी घेण्याची मागणी

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “मी राज्यात अनेक वर्ष काम केलं. बाळासाहेब ठाकरे आणि आमचे इतके जाहीर मतभेद असायचे की एकमेकांबद्दल शब्द वापरताना आम्ही कधी काटकसर केली नाही. पण ही बैठक संपल्यानंतर संध्याकाळी आम्ही एकमेकांच्या घऱी असायचो. अनेक वेळा औरंगाबादला सभेत आम्ही विरोधकांवर तुटून पडायचो. पण ती सभा संपल्यानंतर त्यावेळच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत आमची संध्याकाळ जायची. सभेत काय बोललो याचं स्मरणही कधी व्हायचं नाही, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ही परंपरा सुरु होती”.

“महाराष्ट्राच्या विधीमंडळात अनेकदा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना विरोधकांसोबत टोकाची चर्चा व्हायची. पण चर्चा संपल्यानंतर एकत्र बसून राज्याच्या हिताचा विचार करायचे. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण दुर्दैवाने अलीकडे नको त्या गोष्टी पहायला मिळत आहेत,” अशी खंत शरद पवारांनी बोलून दाखवली.

“…तर लोक चपला मारतील”; सोमय्या दिल्लीत पोहोचल्यानंतर संजय राऊत संतापले; म्हणाले “राष्ट्रपती राजवट लावा”

“मुख्यमंत्र्यांवर धोरणात्मक टीका करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण त्यांचं एकेरी नाव घेत वेडंवाकडं बोलणं शोभत नाही. मुख्यमंत्री म्हणजे एक संस्था आहे. त्याचा आदर ठेवला पाहिजे, पण ते न ठेवण्याची भूमिका काहीजण घेतात. आणि तुम्हाला धार्मिक कार्यक्रम करायचा असेल तर तुमच्या घरी करु शकता. पण माझ्या दारात येऊन करतो म्हटल्यावर त्यामुळे माझ्याबद्दल आस्था असणाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली तर दोष देता येणार नाही. अलीकडे या पद्धतीची भूमिका काहीजण मांडत आहे. पण लवकरच हे सर्व शांत होईल अशी आशा करुयात. आम्हा लोकांची भूमिका मतभेद कसा वाढणार नाही आणि राज्याची जुनी परंपरा आहे ती कशी कायम राहील याची काळजी घेण्याचा प्रयत्न असेल,” असं शरद पवारांनी म्हटलं.

“सत्ता गेल्यानतंर लोक अस्वस्थ होतात”

भाजपाकडून राष्ट्रपती राजवट लागण्याची मागणी होत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता पवार म्हणाले की, “सत्ता गेल्यानतंर लोक अस्वस्थ होतात. सगळे काय माझ्यासारखे नसतात. १९८० मध्ये माझं सरकार बर्खास्त केलं. रात्री १२.३० वाजता मुख्य सचिवांनी मला ही माहिती दिली. त्यानंतर तीन चार मित्रांना बोलावलं आणि घरातल सामान आवरलं. सकाळी ७ वाजता दुसऱ्या जागेत राहायला गेलो, सरकारी गाडी सोडली. त्यादिवशी इंग्लंड आणि भारताचा सामना होता. १० वाजता वानखेडेवर सामना पाहण्यासाठी गेलो आणि दिवसभर सामन्याचा आनंद लुटला”.

“सत्ता येते आणि जाते…पण त्यामुळे अस्वस्थ होण्याचं कारण नाही. पण सध्या काही लोक फार अस्वस्थ आहेत. पण त्यांना दोष देता येऊ शकत नाही. कारण निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार, मी येणार अशा घोषणा त्यांनी केल्या. पण ते घडू शकलं नाही याची अस्वस्थता असते. पण या सर्वांना या परिस्थितीतून काय परिणाम हे लक्षात येईल आणि योग्य वातावरण निर्माण करण्यास सहकार्य लागेल अशी अपेक्षा करुयात,” असं शरद पवार म्हणाले.

“अस्वस्थ असलेले लोक कोणते मार्ग खुले आहेत या खोलात जाणार आणि त्याचा फार विचार करण्याची गरज नाही. राष्ट्रपती राजवट लावण्याच्या चर्चा केल्या जातात, दमदाटी केली जाते पण त्याचा काही परिणाम होत नाही. निवडणुका लागल्या तर निकाल काय लागतात हे कोल्हापूरने सांगितलं आहे. त्यामुळे कोणी त्या टोकाला जाईल असं वाटत नाही,” असं शरद पवार किरीट सोमय्यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोलताना म्हणाले.

“भोंग्यासंदर्भात राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली ही चांगली गोष्ट आहे. सगळ्यांशी बोलायची पद्धत होती. त्यातून काही चांगलं निघालं तर आनंद आहे,” असं शरद पवार म्हणाले.

“देशातल्या अनेक राज्यांमध्ये वीजेचं संकट”

“देशातल्या अनेक राज्यांमध्ये वीजेचं संकट आहे. गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशात यावेळी वीजेची कमतरता आहे. प्रमाणापेक्षा जास्त वापर झाल्याने हे संकट आलं आहे. विशेषत: शेती आणि इतर गोष्टींसाठी मागणी वाढत चालली आहे. कच्च्या मालाचा तुटवडा आहे. सर्वांनी बसून यावर मार्ग काढला पाहिजे. तसंच राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मुख्यमंत्री आपला बराच वेळ यावर मार्ग काढण्यासाठी देत असतात. परिस्थिती सुधारत आहे,” असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp sharad pawar on hanuman chalisa row in maharashtra matoshree shivsena navneet ravi rana sgy

ताज्या बातम्या