ब्रिटन आणि भारतातील मोठे उद्योग एकमेकांच्या बाजारपेठेत स्थिरावले असले तरी लहान आणि मध्यम उद्योगांना या बाजारपेठेत शिरकाव करण्यासाठी सहकार्याची गरज असल्याचे मत युनायटेड किंग्डमचे व्यापार व गुंतवणूक मंत्री लॉर्ड स्टीफन ग्रीन यांनी व्यक्त केले. युनायटेड किंग्डम आणि भारत हा द्विपक्षीय व्यापार २०१५ पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्टही त्यांनी बोलून दाखवले. ग्रीन यांनी शुक्रवारी ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर’ला (एमसीसीआयए) भेट दिली. या वेळी ते बोलत होते.
एमसीसीआयएचे अध्यक्ष एस. के. जैन, सरसंचालक अनंत सरदेशमुख, ब्रिटनचे मुंबईतील वरिष्ठ उपायुक्त कुमार अय्यर, ‘किलरेस्कर ब्रदर्स’ चे अध्यक्ष संजय किलरेस्कर, जेसीबी कंपनीचे उपाध्यक्ष दीपक शेट्टी या वेळी उपस्थित होते.
यूके आणि भारत यांच्यादरम्यान असलेले आर्थिक संबंध दृढ होण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे ग्रीन यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘या दोन्ही देशांसमोर काही स्थानिक समस्या आहेत. परंतु तरीही ते विकासाच्या मार्गावर आहेत. भारतीय आणि ब्रिटिश कंपन्या एकमेकांबरोबर चांगल्या पद्धतीने काम करतात. तसेच त्या एकमेकांच्या देशात यशस्वी गुंतवणूकही करत आहेत. पुण्यातच या प्रकारच्या साहचर्याची काही उत्तम उदाहरणे पाहायला मिळतात. परंतु या कंपन्यांनी केवळ एकमेकांच्याच बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा जगभर विस्तार करण्याचा प्रयत्न करायला हवा.’’
ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशनच्या आकडेवारीनुसार २०११ साली भारत आणि यूकेचा द्विपक्षीय व्यापार २६ टक्क्य़ांनी वाढून तो १६.९ अब्ज पाऊंड झाला. त्याआधी, २०१० साली हा व्यापार १३ अब्ज पाऊंड इतक्या मूल्याचा होता. द्विपक्षीय व्यापार २०१५ पर्यंत दुप्पट करण्याचे लक्ष्य यूकेने ठेवले आहे, तर भारताने हा व्यापार २४ अब्ज पाऊंडावर नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यूकेमध्ये गुंतवणूक करायच्या बाबतीत देशाचा पाचवा क्रमांक लागतो. सुमारे ९०० भारतीय कंपन्या यूकेमध्ये असून २०११ मध्ये देशातील उद्योगांनी तिथे नवीन ८१ प्रकल्प सुरू केले होते. देशाच्या २०११ मधील एकूण निर्यातीपैकी ३ टक्के निर्यात यूकेला करण्यात आली होती.
संग्रहित लेख, दिनांक 21st Sep 2013 रोजी प्रकाशित
यूके आणि भारतातील लहान व मध्यम उद्योगांना विस्तारासाठी मदत हवी – ‘यूके’ च्या व्यापार व गुंतवणूक मंत्र्यांचे मत
ब्रिटन आणि भारतातील लहान आणि मध्यम उद्योगांना या बाजारपेठेत सहकार्याची गरज असल्याचे मत युनायटेड किंग्डमचे व्यापार व गुंतवणूक मंत्री लॉर्ड स्टीफन ग्रीन यांनी व्यक्त केले.

First published on: 21-09-2013 at 02:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Needs some more help to expand trade between u k and india