दौंड रेल्वे स्थानकाजवळ थांबलेल्या हावडा-पुणे आजाद हिंदू एक्स्प्रेसवर मंगळवारी दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारच्या घटना या मार्गावर नव्या नाहीत. दरोडेखोरांनी अनेकदा प्रवाशांना जखमी करून लूटमार केली आहे. त्याचप्रमाणे ठराविक टप्प्यातच सातत्याने दरोडा टाकण्याचे प्रकार होत असतानाही रेल्वेने अद्यापही सुरक्षेबाबत ठोस पावले उचललेली नाहीत. या निष्काळजीपणामुळे दरोडेखोरांना सातत्याने मोकळे रान मिळत असून, प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
पुणे-मनमाड व पुणे-सोलापूर या मार्गावर सातत्याने रेल्वेच्या डब्यांमध्ये प्रवाशांना लुटण्याच्या घटना घडतात. दौंड ते भिगवण, जेजुरी व सासवडचा पट्टा तसेच नगरपासून पुढे मनमाडच्या पट्टय़ामध्ये दरोडेखोरांकडून अनेकदा प्रवाशांना जखमी करून त्यांना लुटण्याचे प्रकार झाले आहेत. रात्रीच्या वेळी सिग्नल न मिळाल्याने मध्येच रेल्वे थांबल्यानंतर दरोडेखोर गाडय़ांमध्ये चढतात. त्याचप्रमाणे विविध ठिकाणी रेल्वे फाटक असल्याने त्यामुळेही वेळेत सिग्नल मिळू शकत नाही. महत्त्वाचे म्हणजे एकेरी मार्ग व वळसा घालून गाडय़ा जात असल्याने या टप्प्यांमध्ये अनेकदा गाडय़ांचा वेग कमी होतो. त्याचा फायदा रात्रीच्या वेळी दरोडेखोरांकडून घेतला जातो.
लांब पल्ल्याच्या व महत्त्वाच्या गाडय़ा दरोडेखोरांकडून लक्ष्य केल्या जातात. त्यामुळे या गाडय़ा इतरत्र थांबवू नयेत, अशा सूचना आहेत. मात्र, सिग्नलच नसल्यास चालकाला गाडी थांबविणे भागच असते. या गाडय़ा मध्येच कुठेही थांबू नयेत, यासाठी कोणतेही नियोजन नाही. संपूर्ण गाडीमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे दोन ते तीनच कर्मचारी असतात. ते सर्वच डब्यांमध्ये लक्ष ठेवू शकत नसले तरी धोका होणारी ठिकाणे आजवर अनेकदा स्पष्ट झाली आहेत. त्या ठिकाणी विशेष सुरक्षा देण्याबाबतही कोणतेच धोरण रेल्वेने अद्यापही ठरविलेले नाही. मुळात सुरक्षेच्या दृष्टीने कमी असलेले मनुष्यबळ वाढविण्यावरही भर देण्यात येत नाही. अगदी क्षुल्लक बाब म्हणजे मोठय़ा गाडय़ा उभ्या राहू शकतील असा फलाट, फलाटाच्या परिसरामध्ये पुरेशा प्रमाणात दिवे बसविण्याचे कामही रेल्वेकडून अनेक वर्षांत होऊ शकलेले नाही.
प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाच्या या निष्काळजीपणाबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षां शहा याबाबत म्हणाल्या, प्रवासी हा रेल्वेचा ग्राहक आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्याला सुरक्षा मिळालीच पाहिजे. मार्गाचे विद्युतीकरण नसणे, दुहेरी मार्ग नसणे, स्वयंचलित सिग्नल यंत्रणा नसणे, या गोष्टीही प्रवाशाच्या सुरक्षेला बाधा आणणाऱ्या ठरतात. गाडीत एखादा गुन्हा घडत असताना त्याची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येते, मात्र अशा प्रकारची माहिती देत असताना प्रत्यक्षात अनेकदा वेगळाच अनुभव येतो. काही वेळेला हद्दीचे कारण दिले जाते. दुसरीकडे दौंडबाबत रेल्वेच्या पुणे विभागाकडूनही हद्दीचाच वाद घातला जातो. दौड पुण्यात नव्हे तर सोलापूर विभागात असल्याचे सांगण्यात येते. हद्दी तुमच्यासाठी आहेत. त्याच्याशी प्रवाशांचे काहीही घेणे-देणे नाही. प्रवाशांना प्राधान्याने सुरक्षा मिळालीच पाहिजे. त्यासाठी ठोस योजना गरजेच्या आहेत.
छायाचित्र काढण्यापेक्षा मदत करा
मंगळवारी हावडा-पुणे एक्स्प्रेसमध्ये दरोडेखोरांनी माय-लेकीवर हल्ला करून त्यांना जखमी केले. मात्र, दोघींनी निकराचा प्रतिकार केल्याने त्यांच्यावर शस्त्राने वार करून दरोडेखोर पसार झाले. ही घटना घडत असताना सहप्रवाशांनी बघ्याची भूमिका घेतली. घटनेनंतर मात्र दोघींचे अनेकांनी मोबाइलवरून छायाचित्र काढले. याबाबतही संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरोडेखोर दोन-चार असतात, मात्र गाडीमध्ये प्रवाशांची संख्या त्यांच्यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक असते. सर्वानी मिळून अशा प्रसंगी एकमेकांना मदत केल्यास अनेक घटना टाळता येऊ शकतात, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.