उत्पादन शुल्क विभागापुढे कारवाईचे आव्हान
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गालगतच्या भागातील अधिकृत मद्यविक्रीची दुकाने, मद्यालये बंद करण्यात आल्यानंतर या बंदीची संधी साधत केवळ अवैधच नव्हे, तर बनावट मद्याचे जाळे अधिकच सक्रिय झाल्याचे दिसून येते आहे. विशेषत: शहरालगतच्या भागांमध्ये काही ठिकाणी मद्य उपलब्ध होत असून, त्यातील बहुतांश मद्य बनावट असल्याचे सांगण्यात आले. बनावट मद्याचे हे जाळे महामार्गावरून हळूहळू शहरात विस्तारण्याची चिन्हं आहेत. या ‘उद्योगा’वर कारवाई करण्याचे आव्हान उत्पादन शुल्क विभागापुढे निर्माण झाले आहे.
महामार्ग आणि राज्य मार्गापासून पाचशे मीटर अंतरापर्यंतची मद्यविक्री न्यायालयाच्या निर्णयानंतर १ एप्रिलपासून बंद करण्यात आली आहे. पुणे आणि िपपरी-चिंचवड शहरामध्ये पुणे-मुंबई, पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-बंगळुरू, पुणे-नगर, पुणे-आळंदी, हडपसर-सासवड, शेलारवाडी-देहू-आळंदी-फुलगाव-लोणीकंद, पाषाण-सूस-नांदे, औंध-शेलारवाडी, कोंढवा (खडी मशीन चौक)-सासवड, पुणे-खडकवासला-डोणजे, चंदननगर-वडगाव शेरी-मुंढवा-हडपसर मगरपट्टी सिटी आदी रस्त्यांवरील मद्यालये आणि मद्याची दुकाने बंद करण्यात आली आहेत. बंदीनंतर सुरुवातीच्या काळामध्ये कोठेही मद्य उपलब्ध होत नव्हते, मात्र शहरालगतच्या भागामध्ये हळूहळू वेगवेगळ्या ठिकाणी मद्य उपलब्ध होत आहे.
पुणे-मुंबई, पुणे-नाशिक, पुणे-नगर, पुणे-सोलापूर आदी प्रमुख रस्त्यांच्या शहरालगतच्या भागामध्ये काही जण टपऱ्या आणि छोटय़ा हॉटेलांमध्ये मद्याच्या बाटल्यांची विक्री करीत असल्याचे या मार्गावरून नेहमी प्रवास करणाऱ्यांकडून सांगण्यात आले. यापूर्वीही अवैध प्रकारे काही प्रमाणात मद्याची विक्री होत होती. मात्र, आता बंदीनंतर हे जाळे मोठय़ा प्रमाणावर सक्रिय करण्यात आले आहे. मद्याची विक्री होत असली, तरी ते पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे मोटारीमध्येच किंवा रस्त्यालगत एखादी मोकळी जागा पाहून ‘पार्टी’ रंगविली जात आहे. गंभीर बाब म्हणजे हे मद्य बनावट असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
अवैध आणि बनावट मद्याचे हे जाळे शहरांच्या अंतर्गत भागामध्येही पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून वेळोवेळी अवैध आणि बनावट मद्यावर कारवाई केली जाते. या विभागामध्ये पूर्वीपासूनच मनुष्यबळाची कमतरता आहे. बंदीमुळे आता सर्वच महामार्ग आणि राज्यमार्गावर तपासणी करावी लागत आहे. अशा स्थितीत अवैध धंद्यावर कारवाईसाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे कारवाईसाठी पोलिसांचीही मदत घेण्यात येत आहे.
उर्वरित मद्यालये संध्याकाळी हाऊसफुल्ल!
शहरालगतच्या आणि शहरातून गेलेल्या महामार्ग आणि राज्यमार्गावरच प्रामुख्याने मद्यालये, मद्य विक्रीची दुकाने होती. ती बंद झाल्यामुळे आता अंतराच्या नियमात बसणारी तुरळक मद्यालये संध्याकाळी अक्षरश: हाऊसफुल्ल होतात. त्याचप्रमाणे मद्य विक्रीच्या काही दुकानांमध्ये चक्क रांगा लागल्याचेही स्थिती असते. अनेक मद्यालये बंद झाली असली, तरी विक्री मात्र फारशी घटली नसल्याचे जाणवते.
अवैध धंदा रोखण्यासाठी ग्रामरक्षक दल
अवैध मद्याच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी शासनाने ग्रामसुरक्षा दल स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातीलच अवैध व्यवसायाला रोखण्यासाठी शासनाकडून तयारी करण्यात आली आहे. ग्रामसुरक्षा दलामध्ये विविध क्षेत्रातील सदस्य असतील आणि एक अध्यक्ष असेल. या दलाला आवश्यक ते कायदेशीर अधिकार देण्यात येणार आहेत. राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात या विषयीची माहिती दिली.