पोलीस दलात नवीन बॉडी प्रोटेक्टर जाकीट दाखल

शहरात होणारी आंदोलने किंवा अन्य घटनांमध्ये अनेकदा पोलिसांवर दगड भिरकावले जातात. अशावेळी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास दंगलसदृश परिस्थितीत पोलीस लोखंडी जाळय़ा, हेल्मेट आणि काठी घेऊन परिस्थितीला सामोरे जातात आणि तणावपूर्ण परिस्थिती हाताळतात. अशा घटना दररोज घडत नसल्या तरी एकंदरच दंगलसदृश घटनांमध्ये पोलिसांना बचाव करता यावा यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाकडून नवीन बॉडी प्रोटेक्टर जाकीट खरेदी करण्यात आली आहेत. वजनाने अतिशय हलके असणारे हे जाकीट दंगल तसेच तणावाच्या घटना हाताळणाऱ्या पोलिसांसाठी कवचकुं डल ठरणार आहे. राज्यभरातील पोलिसांकडे ही जाकीट वितरित करण्यात आली आहेत.

बुलेटप्रूफ जाकीटच्या धर्तीवर नवीन जाकीट तयार करण्यात आले असून, बॉडी प्रोटेक्टर जाकिटाचे वजन पाच ते सहा किलो दरम्यान आहे. त्या तुलनेत बुलेटप्रूफ जाकिटाचे वजन अंदाजे १६ ते १८ किलोग्रॅम असते. गोळीबाराच्या घटनांमध्ये बुलेटप्रूफ  जाकीट बचाव करते. दंगल भडकल्यास पोलिसांवर जमावाकडून दगडफेक तसेच बाटल्या भिरकावल्या जातात. दगडफेकीच्या घटनांमध्ये हे जाकीट उपयुक्त ठरेल, अशी माहिती पुणे पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने दिली.

पोलीस महासंचालक कार्यालयाकडून नवीन बॉडी प्रोटेक्टर जाकिटाची खरेदी करण्यात आली आहे. राज्यभरातील ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच पोलीस आयुक्त कार्यालयांकडे ही जाकिटे वितरित करण्यात आली आहेत. दोन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांना ही जाकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पुणे पोलिसांकडे शंभर जाकिटे देण्यात आली आहेत.

या जाकिटाचे वैशिष्टय़ म्हणजे वजनाने अतिशय हलकी आहेत. हे जाकीट परिधान केल्यानंतर पोलिसांचे हात, पाय, छाती, पाठ या अवयवांचे संरक्षण होईल. फायबरपासून हे जाकीट तयार करण्यात आले असून, अंतर्गत भागात स्पंजचा वापर करण्यात आला आहे.
शिरस्त्राण आणि जाकीट परिधान केल्यास तणावपूर्ण घटनांना सामोरे जाणाऱ्या पोलिसांना दुखापत होणार नाही.

नवे जाकीट वितरित

पुणे पोलिसांच्या अखत्यारित चार परिमंडल आहे. प्रत्येक परिमंडलाकडे एक राखीव कुमक (स्ट्रायकिंग फोर्स) असते. पोलिसांकडे असणाऱ्या स्ट्रायकिंग फोर्सकडे नवीन बॉडी प्रोटेक्टर जाकीट वितरित करण्यात आली आहे. तसेच वज्र आणि लिमा या पथकांना नवीन जाकीट देण्यात आली आहेत. शहरात एखादी तणावपूर्ण घटना घडल्यास तेथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

वेगवान हालचालींसाठी उपयुक्त

नवीन जाकीट हे फायबर तसेच स्पंजपासून तयार करण्यात आले आहे, त्यामुळे ते वजनाने अतिशय हलके आहे. शहरात घडणाऱ्या अनुचित घटनांना सामोरे जाणाऱ्या पोलिसांना पूर्वी शिरस्त्राण, दगडफेकीपासून संरक्षण करण्यासाठी एक लोखंडी जाळी किंवा ढाल (शिल्ड) आणि काठी दिली जायची. आता लोखंडी जाळय़ांची जागा फायबरपासून तयार करणाऱ्या ढालींनी (शिल्ड) घेतली आहे, मात्र पोलिसांच्या संपूर्ण शरीराचे संरक्षण या आयुधांमुळे होत नव्हते. नवीन बॉडी प्रोटेक्टर जाकीट सर्वागाचे संरक्षण करेल. वजनाने हलके असणारे जाकीट परिधान केल्यास पोलिसांच्या हालचाली वेगवान होतील.