राज्य शासनाने ४ मे रोजी घेतलेल्या पदभरती बंदीच्या निर्णयातून प्राध्यापक भरती वगळण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून ते सकारात्मक आहेत. त्यामुळे प्राध्यापक भरतीबाबतचा नवा निर्णय लवकरच जाहीर होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने विद्यापीठांतील एकूण रिक्त जागांच्या ४० टक्के जागा भरण्याचा निर्णय घेऊन प्राध्यापक भरतीची प्रक्रिया प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार काही पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र करोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींमुळे शासनाने पदभरती बंदीचा निर्णय ४ मे रोजी घेतला. त्यानंतर प्राध्यापक भरतीची प्रक्रिया ठप्प झाली.

प्राध्यापक भरतीसंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, की राज्य सरकारने ४ मे रोजीच्या निर्णयानुसार पदभरतीला बंदी घातली आहे. त्यामुळे तासिका तत्त्वावरील (सीएचबी) प्राध्यापकांच्या नेमणुकीला अडथळे येत आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी या भरतीबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तासिका तत्त्वावर नेट किंवा सेटची पात्रता असलेल्या प्राध्यापकांना संधी देण्यात येईल. तसेच पदभरती बंदीच्या निर्णयातून प्राध्यापक भरतीला वगळण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीचा नवा निर्णय लवकर जाहीर होईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

परिस्थिती निवळल्यानंतरच महाविद्यालये, विद्यापीठे सुरू

केंद्र सरकारने शाळा, महाविद्यालये १५ ऑक्टोबरनंतर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, राज्यातील करोना संसर्गाची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये करोनाची परिस्थिती निवळल्याशिवाय सुरू होणार नाहीत, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.