राज्यातील पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतून सामाजिक शास्त्र, विज्ञान, परिसर अभ्यास हे विषय वगळण्यात आले असून मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या विषयांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नवा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत मंगळवारी जाहीर केली आहे. या वर्षीपासून पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतील.

शालेय शिष्यवृत्ती परीक्षा ही चौथी आणि सातवीच्या वर्गासाठी घेण्यात येत होती. गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत खंड घेतल्यानंतर आता या वर्षीपासून ही परीक्षा पाचवी आणि आठवीच्या वर्गासाठी घेण्यात येणार आहे. परीक्षेचा नवा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप परिषदेने जाहीर केले आहे.

परीक्षा मार्गदर्शिका

शिक्षण विभागानेच ‘शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शिका’ तयार केली आहे. त्याचे प्रकाशन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी करण्यासाठी मदत व्हावी. यासाठी शिक्षण विभागाने पहिल्यांदाच अशी मार्गदर्शिका तयार केली असून बालभारती, परीक्षा परिषद आणि सर्व वितरकांकडे ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

परीक्षेचे स्वरूप

  • परीक्षा दोन भागांत घेण्यात येणार असून प्रत्येक भागाची प्रश्नपत्रिका दीडशे गुणांची असणार आहे. ही प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी दीड तासाचा वेळ दिला जाईल.
  • पहिल्या भागात मराठी आणि गणित या विषयांचा समावेश आहे. मराठी पन्नास गुणांचे आणि गणित शंभर गुणांचे असे स्वरूप राहणार आहे. परीक्षेच्या दुसऱ्या भागात इंग्रजी आणि बुद्धिमापन चाचणी या विषयांचा समावेश असून इंग्रजी पन्नास गुणांसाठी आणि बुद्धिमापन चाचणी शंभर गुणांसाठी असे स्वरूप आहे.
  • या प्रश्नपत्रिकांमध्ये ३० टक्के सोपे प्रश्न, ४० टक्के मध्यम काठिण्य पातळी असेलेले प्रश्न आणि ३० टक्के अवघड प्रश्नांचा समावेश असेल.
  • हा अभ्यासक्रम mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.