खास मराठी पदार्थ देणारी जी हॉटेले पुण्यात आहेत, त्यात टिळक रस्त्यावरच्या ‘न्यू रिफ्रेशमेंट’चं नाव आवर्जून घ्यावं लागेल. इथले सगळेच पदार्थ अस्सल मराठी चव जपणारे असतात आणि या चवीची परंपरा वर्षांनुवर्षे कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातली अनेक खाण्याची ठिकाणं किंवा खाऊगल्ल्या वेगवेगळ्या पदार्थासाठी प्रसिद्ध आहेत. चवीचं वेगळेपण जपणाऱ्या अशा ठिकाणांना खवय्यांची नियमित भेट अपरिहार्य असते. टिळक रस्त्यावरचं ‘न्यू रिफ्रेशमेंट हाऊस’ हे एक असंच ठिकाण. मराठी चवीची खासियत जपत खवय्यांना अस्सल मराठी पदार्थ खिलवण्याची इथली परंपरा वर्षांनुवर्ष अखंडपणे सुरू आहे.

मिसळ, बटाटा टोस्ट, घावन, बटाटा वडा, कचोरी, थालिपीठ या आणि अशा अनेक पदार्थासाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे. इथली मिसळ एकदम लोकप्रिय. फोडणीचे पोहे, बटाटा भाजी, शेव आणि त्याच्यावर मटकीची उसळ, खोबऱ्याची र्ती असा या मिसळीचा थाट असतो. वडय़ाचं सारण करताना फोडणी न देता केलेली भाजी हे इथल्या बटाटा वडय़ाचं वैशिष्टय़ आहे. हा देखील इथला एक चविष्ट पदार्थ. पोहे, उपीट, भजी, मटार पॅटिस, मका पॅटिस, घावन, मटार उसळ स्लाईस किंवा मटार उसळ पुरी, कोथिंबीर वडी वगैरे अनेक पदार्थ सांगता येतील, जे खाण्यासाठी लोक आवर्जून इथे येतात.

पाव पातळ भाजी (पाव सँपल नव्हे) ही इथे मिळणारी डिश एकदम वैशिष्टय़पूर्ण. बदल म्हणून ही पातळ भाजी तुम्ही इथल्या पोह्य़ांबरोबरही घेऊ शकता.

इथले उपवासाचे पदार्थही भरपूर मागणी असलेले. त्यातल्या त्यात बटाटा टोस्ट, ओल्या खोबऱ्याची गोड कचोरी, खिचडी, बटाटा भाजी, दाण्याची आमटी, बटाटा चिवडा यांची उपवासाची मिसळ या इथल्या पदार्थाचा आस्वाद सदा सर्वकाळ घेतला जातो. उपवासाचा बटाटा वडा आणि तोच वडा दाण्याच्या आमटी बरोबर घेतला की वडा सांबार किंवा उपवासाचे घावन किंवा उपवास दही वडा असेही पर्याय इथे उपलब्ध असतात. इथल्या पदार्थाबरोबर दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्याही खाण्याची रंगत वाढवतात.

या सगळ्या चवीष्ट पदार्थामध्ये नुकतीच दोन नव्या पदार्थाची भर पडली आहे आणि नेहमीप्रमाणे तेही खवय्यांच्या पसंतीला उतरले आहेत. दडपे पोहे ही तशी फार कमी ठिकाणी मिळणारी डिश. ती इथे नव्याने सुरू झाली आहे आणि कुर्मा पुरी या डिशचीही भर पडली आहे. पातळ पोहे भाजून त्यात कांदा, ओलं खोबरं वगैरे घालून त्याला मस्त चटकदार अशी खमंग आल्याची फोडणी दिलेले दडपे पोहे इथे टेस्ट करून बघाच.

दत्तात्रय गंगाधर सहस्रबुद्धे यांनी १९४८ मध्ये या हॉटेलचे मूळ मालक श्री. मोघे यांच्याकडून हे हॉटेल घेतलं. त्यापूर्वी सहस्रबुद्धे याच व्यवसायाच्या निमित्तानं मिरज, कराड, वाई असा प्रवास करत महाबळेश्वरला पोहोचले होते. त्यांच्या घरची परिस्थिती गरिबीची होती, पण हॉटेल व्यवसायात काही तरी करायचं हे त्यांचं ध्येय होतं. त्यामुळे या व्यवसायात उभं राहण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. महाबळेश्वरचं गेस्ट हाऊस १९४० मध्ये त्यांनी ब्रिटिशांकडून चालवायला घेतलं होतं. पुढे आठ वर्षांनी कृष्णा भुवन हे स्वत:च हॉटेल त्यांनी महाबळेश्वरमध्ये सुरू केलं. त्याचंच रूपांतर पुढे १९७० मध्ये आज प्रसिद्ध असलेल्या गिरीविहारमध्ये झालं. कृष्णा भुवन बरोबरच पुण्यातही न्यू रिफ्रेशमेंटच्या माध्यमातून त्यांनी या व्यवसायात त्यांच्या चवीचा ठसा उमटवला. त्यांच्या नंतर रमेश आणि नंतर विनायक सहस्रबुद्धे यांनी हे हॉटेल उत्तमरीत्या चालवलं आणि चवीष्ट पदार्थाची परंपरा जपत त्यांनी हॉटेलचा लौकिकही वाढवला. आता मेधा सहस्रबुद्धे समर्थपणे हे हॉटेल चालवत आहेत.

इथले सर्व आचारी आणि इतर कामगार मंडळी कोकणातली आहेत आणि अनेक वर्ष हे सगळे इथेच काम करत आहेत. त्यांचं पदार्थ बनवण्यातलं कौशल्य, स्वच्छता, टापटीप हेही लक्षणीय असतं. इथल्या सर्व पदार्थावर कोकणी चवीची छाप आहे. ओल्या नारळाचा वापर इथे सर्व पदार्थामध्ये सढळपणे केला जातो. त्यामुळेच रुचकर आणि चवीची खासियत जपणाऱ्या इथल्या अनेक डिश खवय्यांना प्रिय आहेत.

न्यू रिफ्रेशमेंट हाऊस

  • कुठे ? १६४८ सदाशिव पेठ, टिळक रस्ता
  • केव्हा? सकाळी सव्वाआठ ते रात्री नऊ बुधवारी बंद
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New refreshment house pune marathi food
First published on: 05-08-2017 at 02:56 IST