पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, विद्यार्थीकेंद्रित कारभार, उद्योग क्षेत्राला विद्यापीठाशी जोडणे, क्रमवारीत विद्यापीठाचे स्थान उंचावणे ही पुढील पाच वर्षांसाठीची प्रमुख उद्दिष्टे असतील, अशी भूमिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी मांडली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे २१ वे कुलगुरू म्हणून डॉ. सुरेश गोसावी यांनी आज पदभार स्वीकारला. प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी त्यांच्याकडे सूत्रे सोपवली. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, बागेश्री मंठाळकर, अधिसभा सदस्य डॉ. ज्सोत्स्ना एकबोटे, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, डॉ. देविदास वायदंडे आदी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> आमदार संजय शिरसाठ यांना पुणे न्यायालयाचे समन्स; सुषमा अंधारे यांच्याकडून अब्रुनुकसानीचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यार्थी दशेपासून विद्यापीठात असलेल्या डॉ. गोसावी यांनी शिक्षक, विभागप्रमुख, संचालक अशा विविध जबाबदाऱ्या निभावल्या आहेत. विद्यापीठाला त्यांनी अतिशय जवळून पाहिले आहे. तसेच विविध प्रश्नांची त्यांना कल्पना आहे. आता त्यांची कुलगुरू पदी निवड झाल्यानंतर त्यांच्यासमोर विविध आव्हाने आहेत. या पार्श्वभूमीवर कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. गोसावी म्हणाले, की पुढील पाच वर्षाच्या पुढील कार्यकाळात विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करण्यास भर देणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील. आतापर्यंत त्या दृष्टीने जे कामकाज झाले आहे त्याचा आढावा घेऊन पुढील नियोजन करण्यात येईल. भारतीय ज्ञान प्रणालीचा उच्च शिक्षणात समावेश करण्यास प्राधान्य दिले जाईल. डेक्कन कॉलेज, भांडारकर संस्था अशा संस्थांशी विद्यापीठाचा करार असल्याने त्यांची मदत घेतली जाईल. विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी उद्योगक्षेत्राशी हातमिळवणी आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कार्य प्रशिक्षणाची तरतूद असल्याने या सहकार्याचा उपयोग होईल. त्यामुळे उद्योगांना विद्यापीठाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी नमूद केले. नुकत्याच जाहीर झालेल्या एनआयआरएफ क्रमवारीत विद्यापीठाची घसरण झाली आहे. त्यामुळे आता विविध क्रमवारींमध्ये विद्यापीठाचे स्थान उंचावण्याचेआव्हान डॉ. गोसावी यांच्यासमोर आहे. ‘क्रमवारीतील स्थान घसरण्यामागील कारणांची कल्पना आहे. त्यामुळे त्रुटी दूर करून क्रमवारीतील विद्यापीठाचे स्थान उंचावण्यासाठी नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.