पुणे : ‘राज्यातील गड-किल्ल्यांवर विकसित होत असलेल्या प्रकल्पाला ‘नमो टुरिझम’ नको. तर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे,’ अशी मागणी अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांनी सोमवारी केली. ‘किल्ल्यांकडे केवळ पर्यटनस्थळ म्हणून नाही तर प्रेरणास्त्रोत म्हणून पाहिले पाहिजे’, याकडे लक्ष वेधून ‘गडांवर पार्टी करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे’, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.

‘आपला मावळा’ या बिगर राजकीय संघटनेच्या वतीने रविवारी (२३ नोव्हेंबर) सिंहगडावर ‘गड-किल्ले स्वच्छता आणि स्वच्छता मोहीम’ राबविण्यात येणार असल्याची माहिती नीलेश लंके यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. १६ मार्च रोजी शिवनेरीपासून सुरू झालेल्या या मोहिमेने धर्मवीर गड, रायरेश्वर, रामशेज, तिकोना, प्रतापगड आणि भुदरगड या किल्ल्यांवर स्वच्छता केली असून आठव्या टप्प्यामध्ये रविवारी सिंहगडावर ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे लंके यांनी सांगितले.

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव राजकारणासाठी घेतले जाते. पण, गड-किल्ल्यांच्या संवर्धनाकडे लक्ष देत नाही. यासंदर्भात टीका करण्यापेक्षा ठिणगी बनून काम केले पाहिजे या भावनेतून ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे लंके यांनी स्पष्ट केले. ‘गड-किल्ल्यांच्या दुरवस्थेबाबत आणि तेथील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. पण, किल्ले पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत असल्याने त्यांची डागडुजी करण्याचा अधिकार नाही याची खंत वाटते’, असेही त्यांनी सांगितले.

‘सिंहगडाच्या पायथ्याशी मंदिरात किंवा शाळेच्या खोल्यांमध्ये शनिवारी (२२ नोव्हेंबर) रात्री मुक्काम करून कार्यकर्ते रविवारी सकाळपासून सिंहगडाची स्वच्छता करतील. या मोहिमेमध्ये सहभागी होऊन शिवप्रेमी आणि गड-किल्ले संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मावळा म्हणून योगदान द्यावे’, असे आवाहन नीलेश लंके यांनी केले.

खासदार नीलेश लंके म्हणाले…

– ठाकरे बंधू एकत्र आले याचा आनंद आहे. त्याच धर्तीवर शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंदच आहे. पण, या विषयावर भाष्य करण्याची माझी पात्रता नाही. यासंदर्भात पक्षाचे ज्येष्ठ नेते बोलतील.

– सहकाराच्या माध्यमातून विखे कुटुंबाच्या तीन पिढ्यांनी नगर जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासामध्ये मोठे योगदान दिले आहे. हे ध्यानात घेऊनच विखे कुटुंवाबर व्यक्तिगत टीका करणार नाही.

– बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून अजून मी दिल्लीला गेलो नाही. त्यामुळे ‘दहा हजार रुपयांमध्ये निवडणूक बदलली का?’ याची माहिती घेऊन अभ्यास करावा लागेल. या विषयावर पुरेशी माहिती नसताना कोणत्याही स्वरूपाचे भाष्य करणे योग्य होणार नाही.