पुणे : ‘समाजातील विचारभिन्नता नव्हे, तर विचारशून्यता ही आजची आपल्यापुढची खरी समस्या आहे,’ असे मत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केले.
शताब्दी वर्षानिमित्त गीताधर्म मंडळाच्या वतीने नितीन गडकरी यांना मंडळाचे अध्यक्ष डाॅ. मुकुंद दातार यांच्या हस्ते गीताधर्मव्रती विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, राष्ट्रसेविका समिती, नागपूरच्या वतीने गडकरी यांच्या हस्ते प्रसिद्ध निरुपणकार मोहना चितळे यांना वंदनीय ताई आपटे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी गडकरी बोलत होते. राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहप्रमुख चित्रा जोशी, गीताधर्म मंडळाच्या कार्यवाह विनया मेहेंदळे आणि कार्यकारिणी सदस्य शैलजा कात्रे या वेळी उपस्थित होत्या. डाॅ. मुकुंद दातारलिखित ‘भारतीय संविधान व भगवद्गीता एक चिंतन’ या पुस्तिकेचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
गडकरी म्हणाले, ‘आपल्या आजुबाजूला विचार आणि दिशा नसणारी माणसे मोठ्या प्रमाणावर दिसतात. विचारशून्यता हीच समाजाची मोठी समस्या आहे. अशा पार्श्वभूमीवर आपली संस्कृती आणि विचार खूप महत्त्वाचा आहे. भविष्यात समाज आणि देश चांगल्या दिशेने जाण्यासाठी मूल्याधिष्ठीत जीवनपद्धती ही मोठी ताकद ठरणार आहे. जीवनाला प्रस्थापित करणारे तत्त्वज्ञान भगवद्गीतेत आहे. गीतेचे तत्वज्ञान हे जीवनाला मार्गस्थ करणारे आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांत उपयोगी ठरणारे आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून गीतेचे सार छोट्या छोट्या गोष्टींतून मुलांपर्यंत कसे पोहोचवता येईल, याचा विचार करावा.’ चितळे म्हणाल्या, ‘जीवनाला अर्थ कसा द्यावा, हे गीता शिकवते. जीवनात दुःख, विषण्णता, द्वंद्व येणार हे माहीत असूनही प्रसन्नता कशी अबाधित ठेवायची, हा गीतेचा पहिला धडा आहे.’
५० हजार विद्यार्थ्यांकडून गीतेचा अध्याय पठण
दैनंदिन कामामुळे गीता प्रसाराच्या कामात मला वेळ देता येत नसला, तरी माझी पत्नी त्या कामात सक्रिय आहे, असे आवर्जून नमूद करून गडकरी म्हणाले, ‘गेल्या वर्षी त्यांनी आयोजित केलेल्या तीन उपक्रमांची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड’मध्ये झाली आहे. या वेळी त्यांनी आणखी मोठा उपक्रम हाती घेतला असून, ५० हजार विद्यार्थी एकत्र येऊन गीतेचा अध्याय म्हणणार आहेत. हा सुद्धा एक विश्वविक्रम ठरेल.’