भाजप-शिवसेना-रिपाइं महायुती सत्तेवर आल्यानंतर टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचे जाहीर करणाऱ्या गोपीनाथरावांनी त्या संदर्भात नक्कीच विचार केला असेल. योग्य वेळी ते याविषयीची माहिती देतील, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कोर्टात चेंडू ढकलला. टोलसंदर्भात गोपीनाथराव आणि मी, आमच्या दोघांच्याही भूमिका बरोबर असल्याचे त्यांनी स्पष्ट करीत प्रसारमाध्यमेच आमच्यामध्ये वितुष्ट असल्याच्या बातम्या दाखवितात, असा दावा केला.
टोलसंदर्भात आपण एक बोलता आणि मुंडे यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू अशी घोषणा केली आहे. त्यामुळे पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे, असे विचारले असता गडकरी यांनी आम्हा दोघांच्याही भूमिका बरोबरच असल्याचे सांगितले. ज्या अर्थी ही घोषणा झाली, त्या अर्थी गोपीनाथरावांनी या विषयाचा विचार केला असेल. योग्य वेळी ते माहिती देतील, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी टोल आकारला गेलाच पाहिजे. मात्र, युती सरकार सत्तेवरून गेल्यानंतर गेल्या काही वर्षांत टोल आकारणीमध्ये पारदर्शकता तर राहिलीच नाही. उलट काही ठिकाणी टोल आकारणीचा अतिरेकच झाला आहे, असेही ते म्हणाले.
टोल या बाळाचे पितृत्व माझ्याकडेच जाते. ठाणे-भिवंडी हा बायपास करताना लागू करण्यात आलेला टोल ही मजबुरी होती, असे सांगून गडकरी म्हणाले, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग पूर्ण झाल्यानंतर टोल आकारणीमुळे त्याची किंमत वसूल होण्यास मदत झाली आहे. रस्तेबांधणी क्षेत्रात खासगी गुंतवणूक आली नसती, तर मुंबईमध्ये ५५ उड्डाणपूल झालेच नसते. टोल लागू केला त्या वेळी टोल देणारे लोक केवळ दोन टक्केच होते. त्यामध्ये आता थोडीशी वाढ झाली आहे. युती सरकार सत्तेवरून गेल्यानंतर टोल आकारणीचा अतिरेक झाला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. वरळी-बांद्रा सागरी सेतू उभारण्याचे कंत्राट अजित गुलाबचंद यांच्या कंपनीला ४२० कोटी रुपयांमध्ये दिले होते. मात्र, प्रत्यक्ष हा सेतू साकारला गेला तेव्हा त्याची किंमत १८०० कोटी रुपये झाली.
केंद्रीय कृषिमंत्री या नात्याने शरद पवार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असेल, तर त्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे एवढे भांडवल का करीत आहेत, या प्रश्नाला थेट उत्तर देण्याचे गडकरी यांनी टाळले. गेल्या आठवडय़ात मी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे जेवायला गेलो होतो. पंतप्रधान आणि जसवंतसिंग यांच्याकडे मोर आहेत. माझ्याकडे माकडे आहेत. त्यांचे मोर माझ्या अंगणात तर माझ्याकडची माकडे त्यांच्याकडे जातात, असेही त्यांनी सांगितले.
‘आप’ची लाट ओसरत चाललीय
अरविंद केजरीवाल यांच्या ‘आम आदमी पक्षा’चा प्रभाव तात्पुरता होता. ही लाट आता ओसरत चाललीय, असे सांगत नितीन गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीत आपचा प्रभाव जाणवणार नाही, असा दावा केला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा फायदा ‘आप’ला झाला. आता आपची लाट केवळ प्रसारमाध्यमातच आहे, असेही ते म्हणाले. सर्वच क्षेत्राची घसरण होत असून राजकारण त्याला अपवाद नाही. संस्कारित माणसे चांगले काम करतील, तेव्हाच गुणात्मक फरक होईल, असे सांगतानाच त्यांनी निवृत्त पोलीस अधिकारी डॉ. किरण बेदी यांची राजकारणात येण्याची इच्छा दिसत नाही, असे स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari toll issue gopinath munde bjp
First published on: 03-03-2014 at 03:25 IST