पुणे : राज्य सरकार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना कायम ठेवणार असून, कोणाचेही पैसे परत घेणार नाही. तसेच योजनेसाठी कोणतेही नवे निकष लावणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘हिंदू गर्जना’ कुस्ती स्पर्धेला भेट दिली. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘आम्ही जनतेच्या पैशाचे रक्षक आहोत. पण आम्हालाही महालेखापालांनी विचारल्यावर उत्तर द्यावे लागते. त्यामुळे जर कुणी नियमाबाहेर जाऊन फायदा घेत असेल, तर ते निश्चितच रोखले जाईल आणि आम्ही तशा पडताळणीस सुरुवात केली आहे. ‘लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही नवा निकष लावला जाणार नाही. योजना जाहीर करण्यात आली, तेव्हा जे निकष होते तेच कायम राहणार आहेत. निकषांपेक्षा वेगळे अर्ज ज्या महिलांनी केले त्यांच्यावरच कारवाई होत आहे. काही बहिणींनी निकषाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर स्वतःहून योजनेचा लाभ घेणे सोडले. आम्ही कोणाचेही पैसे परत घेणार नाही. जे निकषाबाहेर जाऊन फायदा घेत आहेत, त्यांचा फायदा निश्चितपणे बंद केला जाईल.’ असे फडणवीस म्हणाले.

‘इतिहासाविषयी बोलतान जनभावना महत्त्वाची’

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि इतिहासावर बोलताना जनभावनेचा विचार करूनच बोलायला हवे. इतिहासाविषयी बोलताना लोकांची भावना दुखावेल अशा प्रकारचे वक्तव्य कोणी करू नये. अभिनेते सोलापूरकर यांनी या संदर्भात माफीदेखील मागितली आहे. पूर्ण चौकशी करून या संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.‘

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.