एखाद्या शवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वैकुंठ स्मशानभूमी येथूनच स्मशान परवाना घ्यायचा असेल, तर सकाळी सात ते रात्री नऊ या वेळातच घ्यावा लागत आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे रात्री नऊ ते सकाळी सात या वेळात स्मशान परवाना मिळण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे वैकुंठ स्मशानभूमी येथे २४ तास स्मशान परवाना देण्याच्या योजनेचा बोजवारा उडाला असून इथे मरणावरही आता वेळेचे बंधन आले आहे.
शवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशान परवाना आवश्यक असतो. यापूर्वी विश्रामबागवाडा येथील जन्म-मृत्यू नोंदणी केंद्र, ससून रुग्णालय यासह शहराच्या हद्दीतील सर्व जकात नाक्यांवर हा स्मशान परवाना उपलब्ध करून दिला जात होता. मात्र, पुणेकरांच्या मागणीनुसार महापालिकेतर्फे गेल्या पाच वर्षांपासून वैकुंठ स्मशानभूमी येथे स्मशान परवाना देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबरीने येथे स्मशान परवाना घेतला, तर पाच दिवसांनी संबंधित व्यक्तीचा मृत्यू दाखला (डेथ सर्टिफिकेट) मिळण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे वैकुंठ स्मशानभूमी येथेच स्मशान परवाना काढण्यासंदर्भात जागरूकता वाढली आहे. नागरिकांची सोय होत असल्यामुळे येथे स्मशान परवाना देण्याची सुविधा २४ तास उपलब्ध करून देण्यात आली.
पुणे महापालिकेने स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू केल्यापासून शहराच्या हद्दीतील सर्व जकात नाके बंद पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना स्मशान परवान्यासाठी आता विश्रामबागवाडा येथील कार्यालय, ससून रुग्णालय आणि वैकुंठ स्मशानभूमी येथे जावे लागत आहे. वैकुंठ स्मशानभूमी येथे सकाळी सात ते दुपारी अडीच, दुपारी अडीच ते रात्री नऊ आणि रात्री नऊ ते सकाळी सात अशा तीन पाळ्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. येथे तीन कर्मचारी कार्यरत होते. तसेच रात्रपाळीतील कर्मचारी स्मशान परवाना देण्याबरोबरच अंत्यसंस्काराचे विधी देखील करीत आहे. मात्र, येथील आरोग्य निरीक्षकांनी एका कर्मचाऱ्याची टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयामध्ये बदली केल्यामुळे तीन महिन्यांपासून येथील मनुष्यबळ अपुरे झाले आहे. त्यामुळे उर्वरित दोघा कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्टी न घेता किंवा प्रसंगी दोन पाळ्यांमध्ये काम करावे लागत आहे. तर, रात्रपाळीमध्ये काम करणारा कर्मचारी गेल्या १५ दिवसांपासून रजा घेऊन दौऱ्यावर गेल्यामुळे रात्रीच्या वेळेत स्मशान परवाना मिळत नाही. वैकुंठ स्मशानभूमी येथेच स्मशान परवाना घेऊन अंत्यसंस्कार करावयाचे असतील, तर त्यासाठी सकाळी सात ते रात्री नऊ या वेळातच करणे भाग पडत आहे.