पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागांतर्गत आयुर्मान संपलेल्या ‘शिवनेरी’ बसला भंगारातही मागणी नसल्याचे समोर आले आहे. शासनाच्या मेटल स्क्रॅप ट्रेड काॅर्पोरेशन (एमएसटीसी) या कंपनीच्या माध्यमातून तीन लिलाव प्रक्रिया राबवण्यात आल्या. मात्र, ‘शिवनेरी’ बस फायबर बांंधणीच्या असल्याने त्यांची लिलावात खरेदीच झाली नाही. परिणामी, ३२ ‘शिवनेरी’ बस गेल्या अनेक महिन्यांपासून जागेवरच खराब होत चालल्या असून, एसटी महामंडळाची डोकेदुखी आणखी वाढली आहे.
स्वारगेट बस स्थानकात महिलेवर अत्याचाराची घटना घडल्यानंतर आयुर्मान संपलेल्या बसचा मुद्दा समोर आला. नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही भंगारातील बस आणि इतर खासगी वाहनांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्या वेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित वाहने मोडीत काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.
‘एसटी’ महामंडळाच्या पुणे विभागाने आयुर्मान संपलेल्या ७२ बस सेवेतून काढून टाकत नवीन सीएनजीमिश्रित आणि ‘ई-शिवाई’ टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल करून घेण्यास सुरुवात केली. त्यानुसार आयुर्मान संपलेल्या बस केंद्र सरकारच्या धोरणानुसार ‘एमएसटीसी’ पोर्टलद्वारे लिलाव प्रक्रियेत भंगारात काढण्याची प्रक्रिया सुरू केली. याबाबत पुणे एसटी महामंडळाकडून आतापर्यंत तीन लिलाव प्रक्रिया पार पाडल्या गेल्या. त्यात ठेकेदारांकडून जुन्या लालपरी किंवा ‘शिवनेरी’ या बस घेण्यात आल्या. परंतु, ‘शिवनेरी’ ही वातानुकूलित बस भंगारात घेण्यास ठेकेदारांकडून नकार दिला जात असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कारण काय?
‘लालपरी’ची बांधणी ही लोखंडी पत्र्याची होती. आधुनिक ‘शिवनेरी’ बसची बांधणी ही फायबर किंवा इतर मिश्रणाधारित आहे. लिलाव प्रक्रियेदरम्यान लोखंडी आणि फायबर बांधणी असलेल्या बसच्या किमती एकसमान निश्चित केल्या आहेत. ठेकेदारांना आर्थिकदृष्ट्या लोखंडी बांधणीच्या बस फायदेशीर ठरत असल्याने ‘शिवनेरी’ बस तातडीने भंगारात घेण्यास नकार दिला जात आहे.
अडथळा काय?
पुणे विभागात जवळपास ६५ ‘शिवनेरी’ बस आहेत. त्यांपैकी १३ ‘शिवनेरी’ बसचे दापोडी येथे ‘हिरकणी’त रूपांतर करण्यात येत आहे. तर, उर्वरित बसबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या बस डेपोंमध्ये पडून आहेत. त्यामुळे जागेची कमतरता भासत असून, ‘ई-शिवाई’ या बस चार्जिंगसाठी उभ्या करताना अडथळे येत आहेत.
शिवनेरी बसमधल्या लोखंडी सापळ्यावरील बांधणी फायबर युक्त किंवा मिश्रीत आहे. त्यामुळे या बसला मागणी नसून जुन्या मेटलच्या गाड्या मागणी असल्याचे लिलाव प्रक्रियेदरम्यान दिसून आले. – अरुण सिया, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे