शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकत्र आणण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला; पण तो सफल झाला नाही. मनसे आमच्याबरोबर असती तर आमची मते नक्कीच वाढली असती. मात्र आता आम्ही स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत असल्यामुळे मनसेच्या पाठिंब्याची गरज केंद्रात लागणार नाही, असा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला.
शिवसेना व मनसेला एकत्र आणण्यासाठी मी आणि नितीन गडकरी असे आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केले. मात्र ते दोघेही एकत्र यायला तयार नाहीत. ते काम शिवसेनाप्रमुखच करू शकले असते. आता आमची मनसेबरोबर कोणतीही युती नाही. त्यामुळे आम्ही अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात लढत आहोत. राज ठाकरे यांना मोदींनाच पंतप्रधान करायचे आहे, तर त्यांनी सरळसरळ आम्हाला पाठिंबा द्यायला हवा होता. मात्र, त्यांच्या आवाहनाचा मतदानावर परिणाम होणार नाही. मोदींसाठी लोक आम्हालाच मतदान करतील, असे मुंडे यांनी या वेळी सांगितले. ते म्हणाले, की राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्यामुळे निकालानंतर मनसेच्या पाठिंब्याची गरज आम्हाला भासणार नाही.
देशात मोदींची लाट असून महाराष्ट्रातही या वेळी आमचे पस्तीसहून अधिक उमेदवार निवडून येतील आणि उत्तर प्रदेशानंतर जास्त खासदार देणारे म्हणून या वेळी महाराष्ट्र दिसेल, असाही दावा मुंडे यांनी केला.
पवारच बीडमध्ये अडकले
मी मुंडेंना बीडमध्ये कोंडून ठेवीन अशी घोषणा करणाऱ्या शरद पवार यांनाच बीडमध्ये आठ दिवस राहावे लागले आहे. माझ्यापेक्षा पवारच जास्त दिवस बीडमध्ये आहेत आणि मी महाराष्ट्रभर फिरत आहे. त्यामुळे मीच पवार यांना बीडमध्ये अडवले हे सिद्ध झाले, असेही गोपीनाथ मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.