पिंपरी-चिंचवड शहरातील वेगवेगळ्या विसर्जन घाटांवर शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या विसर्जनासाठी पिंपरी महापालिकेने जय्यत तयारी केली असून आयुक्त राजीव जाधव यांनी त्याचा शुक्रवारी आढावा घेतला. विसर्जनासाठी पवना धरणातून पाणी सोडावे लागणार नाही, असे मत आयुक्तांनी व्यक्त केले.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होत असले तरी आदल्या दिवशी विसर्जित होणाऱ्या घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांची संख्या लक्षणीय आहे. यासाठी पिंपरी पालिकेने पूर्ण तयारी केली आहे. विविध विसर्जन घाटांवर भेट देऊन आयुक्तांनी तयारीचा आढावा घेतला. यावेळी शहर अभियंता महावीर कांबळे व अन्य अधिकारी उपस्थित होते. अग्निशामक दल, सुरक्षा विभाग, विद्युत विभाग, आपत्ती व्यवस्थापन यांच्यात समन्वय राखण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. विसर्जनासाठी पवना धरणातून पाणी सोडण्याची आवश्यकता नसल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त केले. आवश्यकतेप्रमाणे मुख्य चौक तसेच विसर्जन घाटांवर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. महापालिकेच्या वतीने चिंचवडगावातील चापेकर चौक, पिंपरीतील कराची चौक आणि भोसरीतील पीएमपी चौक या तीन ठिकाणी स्वागत कक्ष उभारण्यात आले आहेत. तेथे पालिकेच्या वतीने मंडळांच्या प्रमुखांचा सत्कार व मंडळांच्या खेळांचे सादरीकरण होणार आहे.
दरम्यान, पोलिसांकडून विसर्जन होणाऱ्या ठिकाणांवर तसेच विसर्जन मार्गावर सुरक्षिततेच्या दृष्टीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकांमध्ये महिलांच्या छेडछाडीच्या होणाऱ्या घटना लक्षात घेता पोलिसांनी छेडछाड विरोधी पथकाची स्थापना केली आहे. पोलिसांच्या मदतीला विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी देण्यात आले आहेत. मंडळांनी नियमानुसार वागून सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.