असदुद्दीन ओवेसी यांच्या पुण्यातील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली

पुणे कॅन्टोमेन्ट बोर्डाने जागेचे ना हरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे येत्या चार फेब्रुवारीला गोळीबार मैदान येथे आयोजित ‘मुस्लीम आरक्षण परिषदे’ ला वानवडी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

पुणे कॅन्टोमेन्ट बोर्डाने जागेचे ना हरकत प्रमाणपत्र न दिल्यामुळे येत्या चार फेब्रुवारीला गोळीबार मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मुस्लीम आरक्षण परिषदे’ ला वानवडी पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. या परिषदेत ऑल इंडिया मजलीसे इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे भाषण होणार होते. ओवेसीच्या भाषणामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे शिवसेनेच्या कार्यक्रमावर लक्ष राहणार असल्याचे निवेदन शिवसेनेच्या वतीने पोलीस आयुक्तांना दिले होते. त्यानंतर या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे.
अॅक्शन कमेटी महाराष्ट्र व मूलनिवासी मुस्लीम मंचच्या वतीने गोळीबार मैदानावर रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही परिषद आयोजित केली आहे. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील उपस्थित राहणार असून एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांचेदेखील भाषण होणार होते. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण यांनी शनिवारी पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन दिले आहे. त्यामध्ये ‘ओवेसी यांच्या भाषणाची पाश्र्वभूमी बघता समाजात तेढ निर्माण होऊन हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावण्याचा संभव आहे. ओवेसी यांच्या भाषणामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या तर शिवसेना सहन करणार नाही. सभा शिवसेनेच्यावतीने बंद पाडण्यात येईल. या वेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीला आयोजक जबाबदार राहतील,’ असे म्हटले आहे. त्यानंतर वानवडी पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली आहे. या वेळी बोर्डाने जागा न दिल्याच्या कारणाबरोबरच, वाहतूक कोंडी व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

‘‘गोळीबार मैदान हे पुणे कॅन्टोंमेन्ट बोर्डाच्या मालकीचे आहे. या मैदानावर ४ फेब्रुवारीला होणाऱ्या कार्यक्रमाला बोर्डाने जागेसाठी परवानगी दिलेली नाही. एखाद्या कार्यक्रमाच्या परवानगीसाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. त्यामध्ये जागा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र लागते. ते अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे ४ फेब्रुवारीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आहे.’’

पाेलीस सहअायुक्त संजीवकुमार

‘‘कॅन्टोमेंन्ट बोर्डाने गोळीबार मैदानाची जागा देण्यास नकार दिल्यामुळे कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शिवसेनेने पोलीस आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी घाबरून हा निर्णय घेतला आहे. मुस्लीम आरक्षण विषयावर हा एक सामाजिक कार्यक्रम होता. याला विविध जाती-धर्माचे लोक येणार आहेत. हा कार्यक्रम एमआयएमचा नसून पुण्यातील सामाजिक संघटनांनी आयोजित केला आहे. याबाबत बैठक बोलविण्यात आली आहे. त्यात पुढील दिशा ठरेल. मात्र, हा कार्यक्रम नक्की घेतला जाईल.’’
– अंजुम इनामदार, कार्यक्रमाचे संयोजक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: No permission to owaisi speech