पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्यासह कार्यकर्त्यांच्या विरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी गणेश बिडकर यांच्यासह मयूर चव्हाण, नईम शेख, बाला शेख यांच्या विरुद्ध अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युवक काँग्रेस कॅन्टोन्मेंट विभागाचे माजी अध्यक्ष फैयाज कासम शेख (वय ३८, रा. २१६ मंगळवार पेठ, मालधक्का चौक) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बिडकर आणि त्यांचे कार्यकर्ते रविवारी (२६ फेब्रुवारी) दुपारी दोनच्या सुमारास मंगळवार पेठेतील आएशा काॅम्प्लेक्समध्ये कार्यकर्त्यांसह आले होते. फैयाज शेख आणि त्यांचे मित्र याकूब बशीर शेख या भागात फिरत होते. त्या वेळी भाजपाचे कार्यकर्ते आएशा काॅम्प्लेक्समध्ये पैसे वाटप करत असल्याची माहिती शेख यांना मिळाली.

हेही वाचा – कसब्यात ५०, चिंचवडमध्ये ५०.४७ टक्के मतदान; घटलेल्या टक्क्याचा लाभ कोणाला? गुरुवारी मतमोजणी

त्यानंतर शेख तेथे गेले. तेव्हा भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या हातात केशरी रंगाची पिशवी दिसून आली. पिशवीत मतदार स्लिप ठेवण्यात आल्या होत्या. पिशवीत पैसे असल्याचे शेख यांना समजले. त्यांनी बिडकर आणि कार्यकर्त्यांकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी फैयाज आणि याकूब शेख यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली, असे फैयाज शेख यांनी पोलिसांकडे दिलेल्या अदखलपात्र तक्रारीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक माळी तपास करत आहेत.

हेही वाचा – मराठी साहित्यविश्वात नव्या दमाची ऊर्जा; पुस्तक प्रकाशन, विक्री, वितरणात तरुणांचा पुढाकार

दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीत रविवारी पैसे वाटप करण्यात आल्याचे आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. गंज पेठ भागात पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून दोन गटात वाद झाला. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक विष्णू हरिहर यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हरिहर यांच्या कार्यकर्त्यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली असून, एका गटाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Noncognizable offence against former bjp corporator ganesh bidkar after allegation of money distribution in kasba election pune print news rbk 25 ssb
First published on: 27-02-2023 at 09:24 IST