पुणे : उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी बुधवारी किमान तापमानात घट होऊन गारठ्यात वाढ झाली आहे. नगरमध्ये ९.० अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. पुणे शहरातही यंदाच्या हिवाळ्यात सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. महिनाअखेरपर्यंत राज्यात गारठा राहण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा आणि लगतच्या विदर्भावर हवेच्या वरील स्तरात असणारी वाऱ्याची चक्रीय स्थिती आता पूर्व विदर्भावर गेली आहे. दक्षिण कर्नाटकपासून विदर्भ आणि छत्तीसगडपर्यंत हवेची द्रोणीय रेषा तयार झाली आहे. तसेच अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर हवेची चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. हवामानाच्या वरील प्रणालींमुळे राज्यातील हवेत आर्द्रता वाढली आहे. आर्द्रता वाढल्याचा परिणाम म्हणून विदर्भात पुढील दोन दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>>विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर आता लाल किंवा हिरव्या रंगाचा ठिपका, शिक्षण विभागाचा नवा निर्णय काय? वाचा सविस्तर

विदर्भ वगळता राज्यभरात कोरडे वातावरण आहे. बुधवारी उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाल्यामुळे हवेत गारठा वाढला आहे. नाशिकमध्ये ९.०, नगरमध्ये ९.३, जळगावात ९.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. पुणे शहरात (शिवाजीनगर) यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी ९.७ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महिनाअखेरपर्यंत हवेत गारठा राहणार आहे.पुढील २४ तासांत उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात काहीशी घट होण्याचा अंदाज आहे. राज्याच्या विविध भागांत पहाटे धुके पडण्याचीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गहू, हरभऱ्याला पोषक थंडी

राज्यात सध्या किमान तापमानात झालेली घट रब्बी पिकांना फायदेशीर ठरत आहे. गहू, हरभरा, करडई आदी पिकांना थंडीचा फायदा होणार आहे. पण, द्राक्ष, डाळिंब, बोरासारख्या फळपिकांना थंडीचा फटका बसत आहे. थंडीमुळे फळांच्या वाढीची, फळांमध्ये गोड भरण्याची प्रक्रिया संथ होत आहे. काळ्या रंगाच्या द्राक्ष मण्यांना थंडीमुळे तडे जात आहेत. देशाअंतर्गत बाजारात विकल्या जाणाऱ्या द्राक्षांमध्ये गोडी भरण्यास विलंब होत असल्यामुळे द्राक्षांचे खुडे लाबणीवर पडत आहेत.