लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: विवाहानंतर कोणत्याही ठोस कारणाशिवाय जोडीदारासोबत शारीरिक संबंध न ठेवणे क्रुरताच असल्याचे निरीक्षण नोंदवून पतीने घटस्फोटासाठी केलेला अर्ज कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश हितेश गणात्रा यांनी मंजुर केला. पत्नीचे नात्यातील व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याचे समाजमाध्यमावरील संदेशातून उघड झाले असून ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचे कारणही घटस्फोटासाठी महत्त्वपूर्ण ठरले.
अक्षय आणि कृतिका (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. अक्षयच्या वतीने न्यायालयात ॲड. के. टी. आरू-पाटील, ॲड. केदार केवले आणि ॲड. प्रज्ञा गुरसळ यांनी बाजू मांडली. अक्षय आणि कृतिकाचा विवाह एप्रिल २०२० मध्ये झाला. त्यानंतर ती नांदण्यास सासरी गेली. मात्र, तिने पतीशी शरीर संबध ठेवण्यास नकार दिला. ती वारंवार माहेरी जात होती. पतीला तिच्या चारित्र्याबद्दल संशय येत होता. दरम्यान पत्नीचे नात्यातील व्यक्तीसोबतच समाजमाध्यमातील संदेशातून पतीच्या निदर्शनास आले.
आणखी वाचा- पुणे: चंद्रकांत पाटील क्रिकेटच्या मैदानात; विरोधकांना गुगली टाकणाऱ्या पालकमंत्र्यांनी केली फटकेबाजी
काही दिवसानंतर पत्नी पळून गेली. तिने चिठ्ठी लिहिली होती.पतीने पोलिसात पत्नी हरविल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला. त्यावेळी मी मर्जीने घर सोडून गेले होते. ‘नात्यातील एका व्यक्तीसोबत दोन दिवस बाहेर गेली होती. मला पतीबरोबर संसार करायचा नाही’, असा जबाब पत्नीने दिला. नात्यातील व्यक्तीने दोघे सोबत गेल्याचा जबाब दिला. त्यामुळे पतीने मानसिक क्रुरतेच्या कारणाखाली घटस्फोट मिळण्यासाठी डिसेंबर २०२१ मध्ये कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला. त्यावेळी पत्नी आणि नात्यातील व्यक्तीचे समाजमाध्यमातील संदेश न्यायालयात दाखल करण्यात आले.
विवाहनंतर पत्नीने पतीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणे. तसेच नात्यातील व्यक्तीसोबत असलेले संबंध हे मानसिक क्रुरता असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने घटस्फोट मंजुर केला, असे पतीचे वकील ॲड. के. टी. आरु पाटील यांनी सांगितले.