पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्याविरोधात विद्यार्थ्यांनी बेमुदत संप पुकारला असताना सस्थेच्या संचालक मंडळावरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित व्यक्तींची नेमणूक करण्यात आल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ‘पर्सन्स ऑफ इमिनन्स’ अंतर्गत केंद्र सरकारने नेमणूक केलेल्या आठ सदस्यांपैकी चार जण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत.
एफटीआयआयमध्ये नेमणूक करण्यात आलेल्या अनघा घैसास संघ विचारांना मानणाऱय़ा आहेत. त्यांच्या पतीनीही अनेक वर्षे संघ प्रचारक म्हणून काम केले आहे. अनघा घैसास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अयोध्या यांना पाठिंबा देणाऱया लघुपटांचीही निर्मिती केली आहे. दुसरे संचालक नरेंद्र पाठक यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून चार वर्षे काम केले होते. तिसरे संचालक प्रांजल सैकिया यांनी संघाशी संबंधित असलेली संघटना संस्कार भारतीच्या कार्यालयात काम केले आहे. तर चौथे संचालक राहुल सोलापूरकर हे गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांनी स्वतःही हे मान्य केले आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत या चौघांनी सांगितले की, एफटीआयआयमधून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणाऱया विद्यार्थ्यांमध्ये चित्रपट निर्मिती कौशल्याबरोबरच देशप्रेमाची भावनाही निर्माण करणे हेच आमचे या संस्थेत काम करण्यामागचे उद्दिष्ट असेल.