पुणे : सायबर मैत्रा आणि ग्रे फाउंडेशन यांच्या वतीने ‘नथींग डूईंग’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, आज (१३ जुलै) सकाळी दहा ते बारा या दरम्यान कोथरूड येथील दि लाइव्ह येथे ४५ मिनिटे काहीही न करता, केवळ शांत बसून या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. संस्थेच्या अध्यक्षा मुक्ता चैतन्य यांनी ही माहिती दिली.
चैतन्य म्हणाल्या,‘सध्या धकाधकीच्या जीवनव्यवहारात स्वत:कडे बघण्याचा वेळ मिळत नाही. एकावेळी अनेक प्रकारची कामे केल्याने (मल्टी टास्कींग) मानसिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे थोडा वेळ थांबून शांत बसणे गरजेचे ठरते.स्वत:मध्ये डोकावत, स्वत:शीच संवाद साधत, विचारांच्या प्रवाहातून अलगद किनाऱ्यावर येत स्वत:चे निरिक्षण करण्याची संधी या उपक्रमाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.’
‘घरातल्या लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत प्रत्येकावरच आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम होतो. त्यात डिजीटल माध्यमांमुळे समाजातील सर्व घटकांवर आशयाचा भडीमार होतो आहे. बाहेरची धावपळ, नव्या संधी आणि नवी आव्हाने यांच्यात दिवसेंदिवस वाढच होते आहे. त्याने केवळ विचारांचा गुंता वाढत जातो. विज्ञानानेही आता एका वेळी अनेक कामे करण्याचे दुष्परिणाम थेट मेंदूवर होतात, हे सांगितलेच आहे.
शरिराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी आता प्रत्येकानेच एक सुटी घ्यायला हवी. दिवसातला एखादा तास किमान सगळे बाजूला ठेवून स्वत:साठीच द्यायला हवा. विचारांचा गुंता कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. घर, घराबाहेरचे जग आणि त्या जगातल्या धावपळीत स्वत:आत डोकावून पाहणे गरजेचे आहे.’ असे चैतन्य यांनी सांगितले.
या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्यकालाच एक नवा अनुभव मिळेल. स्वत:शी केलेला संवाद हा नव्याने विचार करायला मदत करेल. सहभागी होणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत. परिक्षण समितीच्या माध्यमातून त्यांना गुण देण्यात येतील. त्यानुसार निवडलेल्या प्रत्येक विजेत्याला बक्षिस देण्यात येईल. उपक्रमात सहभाग नोंदवण्यासाठी नोंदणी आवश्यक असून, कार्यक्रमाच्या ठिकाणीही नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ९८२३३८८८२८ या क्रमांकावर संपर्क करावा,’ असे आवाहनही चैतन्य यांनी केले.
हा उपक्रम म्हणडे स्पर्धा नाही. स्वत:ला स्थिर करण्याचा, काहीही न करण्याचा एक प्रयोग आहे. डिजीटल जगाने व्यापलेल्या जगात प्रत्येकासाठी अशा प्रकारची विश्रांती आवश्यक आहे आणि ही त्याचीच एक सुरूवात आहे. – मुक्ता चैतन्य, संस्थापक-अध्यक्ष, सायबर मैत्रा