भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांनी सॅलिसबरी पार्क उद्यानाला दिलेले वैयक्तिक नाव काढून न टाकल्याप्रकरणी महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांना सॅलिसबरी पार्क रेसिडेंट फोरमकडून कायदेशीर नोटीस बजाविण्यात आली आहे.

सॅलिसबरी पार्क रेसिडेंट फोरमच्या वतीने ॲड. श्रीकृष्ण कचवे यांनी नोटीस दिली असून पंधरा दिवसांच्या आत नावाचा बेकायदा फलक काढावा, असे नोटिशीत नमूद केले आहे. नावाचा फलक न काढल्यास कायदेशीर कारवाई कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपुष्टात आल्याने प्रशासक म्हणून आयुक्त विक्रम कुमार महापालिकेचा कारभार पहात आहेत. त्यामुळे चुकीच्या निर्णयाला आयुक्तच जबाबदार आहेत. महापािलकेने उद्यानाला दिलेल्या नावाचा बेकायदा फलक लावून महापालिकेच्या ठरावाचे उल्लंघन केले आहे. यासंदर्भात सॅलिसबरी पार्क रेसिडेंट फोरमने अनेक पत्रे महापालिका आयुक्तांना दिली. त्यासंदर्भात वेळोवेळी बैठकाही झाल्या. मात्र बेकायदा नाम फलकावर कोणतीही कारवाई झालेली नाही, असे या नोटीसीत म्हटल्याची माहिती फोरमचे अध्यक्ष फैजल पूनावाला आणि सदस्या विनिता देशमुख यांनी दिली.