लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या दाव्यात विश्रामबाग पोलिसांनी तपास अहवाल न्यायालयात सादर केला आहे. त्यामध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले आहे. या अहवालाच्या आधारे राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २०४ नुसार कार्यवाहीसाठी नोटीस बजाविली जाणार आहे.

राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी गांधी यांच्याविरोधात शिवाजीनगर न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ नुसार सखोल तपास करून अहवाल सादर करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिला होता. या आदेशाची पूर्तता न केल्याने पोलिसांना नोटीसही बजावण्यात आली होती.

आणखी वाचा-पुणे : रक्ताचे नमुने देणारा कोण? पोलिसांकडून तपास सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विश्रामबाग पोलिसांनी आपला तपासणी अहवाल न्यायालयात सादर केला. राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात नमूद केले आहे. त्यानंतर पोलिसांच्या अहवालाच्या आधारे न्यायालयाकडून फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०४नुसार कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे, असे सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले.