शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे केवळ पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा प्रत्यक्ष निसर्गपर्यटनाचा अनुभव मिळाला पाहिजे, या कल्पनेला पर्यावरण मंत्रालयाने अनुकूलता दाखवली आहे. मंत्रालयाचा ‘नॅशनल ग्रीन कॉर्पस्’ हा प्रकल्प राबवणाऱ्या शाळांच्या विद्यार्थ्यांना चालू वर्षीपासूनच ३ दिवसांच्या निसर्गपर्यटनाची संधी शाळेच्या माध्यमातून मिळणार आहे. ‘महाराष्ट्र स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड’चे (एमएसबीबी) अध्यक्ष डॉ. एरिक भरूचा यांनी ही माहिती दिली. आगामी काळात इतर शाळांतील विद्यार्थ्यांनाही अशी संधी मिळण्याची शक्यता आहे.
किलरेस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पत्रकार परिषदेत भरूचा बोलत होते. ते म्हणाले, ‘‘केवळ पुस्तकांमधून पर्यावरण हा विषय शिकण्यापेक्षा निसर्गपर्यटनाचा अनुभव घेतल्यानंतर विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाऊ शकतो. हे लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांला शालेय जीवनात एकदा तरी निसर्गपर्यटन करायला मिळावे असा प्रस्ताव पर्यावरण मंत्रालयासमोर मांडण्यात आला होता. सध्या राज्यातील नॅशनल ग्रीन कॉर्पस् प्रकल्प राबवणाऱ्या २० ते ३० शाळांमध्येच हा उपक्रम राबवला जाणार आहे. या वर्षीसाठी विद्यार्थ्यांच्या प्रत्येकी तीन दिवसांच्या एकूण सात कॅम्प्सची आखणी करण्यात आली आहे. यात पक्षी निरीक्षणासाठी विद्यार्थ्यांना भिगवणला नेले जाईल. काळविटांसाठी प्रसिद्ध असणारे रेहेकुरी अभयारण्य आणि बोरिवलीचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथेही कॅम्प्स घेण्यात येतील.’’