पुणे : महिला आणि लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढू लागले आहे. लठ्ठपणामुळे हृदयविकाराचा धोका आणखी वाढत असल्याने वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. लठ्ठपणा कमी करून गंभीर आरोग्य समस्या टाळता येतात. त्यामुळे आरोग्यतज्ज्ञांनी लठ्ठपणा नियंत्रित ठेवण्यासाठी आहारासह व्यायामापर्यंतच्या उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे.
जागतिक लठ्ठपणा दिनाच्या औचित्याने आरोग्यतज्ज्ञांनी लठ्ठपणा आणि हृदयाचे आरोग्य यातील संबंध अधोरेखित केला. विशेषत: महिला आणि लहान मुलांमध्ये हे प्रमाण वाढत असल्याने या समस्येवरील उपाय लवकरात लवकर सुरू करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. सह्याद्री हॉस्पिटलमधील कॅथ लॅबच्या संचालिक डॉ. प्रिया पालिमकर म्हणाल्या की, लठ्ठपणा आणि हृदयविकाराचा वाढता धोका यांचा संबंध असतो. शरीरातील अतिरिक्त मेदामुळे काही जैविक बदलांना निमित्त मिळते आणि त्यामुळे रक्तवाहिन्यांध्ये अडथळे निर्माण होतात. त्यातून हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. विशेषतः स्त्रियांमध्ये ही लक्षणे पुसट आणि नजरेतून सहज सुटून जावीत अशी असतात. पुरुषांच्या बाबतीत सर्वसाधारणपणे छातीत दुखणे हे लक्षण जाणवते. त्याउलट रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा असलेल्या महिलांमध्ये असाधारण लक्षणे जाणवतात. यामुळे या आजाराचे लवकर निदान होणे अवघड बनते. अशा संदिग्ध लक्षणांच्या आड खरी समस्या लपून जाते, त्यामुळे केवळ महिलांमध्ये दिसून येणाऱ्या संप्रेरकांच्या पातळीतील बदलांसारख्या असाधारण धोकादायक घटकांना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
आणखी वाचा-राज ठाकरे कार्यकर्त्यांवर का संतापले?
सूर्या मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. अमिता कौल म्हणाल्या की, लठ्ठपणाची समस्या असलेल्या मुलांमध्ये गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊन त्यांचा लवकर मृत्यू होण्याचा धोका असतो. मुलांमध्ये लठ्ठपणा रोखण्यासाठी पालकांनी आरोग्यदायी सवयींवर लक्ष केंद्रित करावे. मुलांनी निरोगी आहाराच्या सवयी आत्मसात कराव्यात आणि पुरेशा शारीरिक हालचाली कराव्यात यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपाय
- आहारात फळे, भाज्या, संपूर्ण धान्यास प्राधान्य द्यावे.
- प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, साखरयुक्त पेये टाळा.
- व्यायाम करण्यासोबत शारीरिक हालचाली वाढविण्यावर भर द्या.
- पुरेशी झोप घेण्यास प्राधान्य द्या.
- मोबाईलवरील वेळ कमी करून शारीरिक हालचाली वाढविणे.