पुणे : ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मुळा-मुठा ‘नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरणा’साठी सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पांत पुराची पातळी कमालीची कमी लेखण्यात आल्याची शक्यता आहे. हवामान बदलामुळे अनपेक्षितपणे होणाऱ्या विसर्गासाठी शहर तयार आहे का, याचा विचार करण्यात आलेला नाही,’ असे निरीक्षण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) ‘पाणी संशोधन केंद्रा’च्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या अहवालात नोंदवले आहे.
‘पुणे-पिंपरी चिंचवड नदी पुनरुज्जीवन’चे सारंग यादवाडकर यांनी ही माहिती दिली. ‘पावसाळ्यात नदीची पातळी आणि धरणांमधील पाणीसाठा जास्त असतो. अतिवृष्टीमुळे महापूर येण्याची शक्यता असते. नदीसुधार प्रकल्पात या शक्यतांचा विचार करण्यात आलेला नाही. पूरपातळी कमालीची कमी लेखण्यात आलेली आहे. प्रकल्प राबवताना पूर पातळीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. शहरातील पूर पातळी आणि पूर वारंवारितेच्या वाढीचा अचूक अंदाज लावणे आव्हानात्मक असते. मात्र, शहराची पूर विसर्गप्रणाली आखताना हवामान बदलामुळे येऊ शकणाऱ्या मोठ्या पुराची दखल घेणे अत्यावश्यक असते. नदीसुधार प्रकल्पात याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे अनपेक्षितपणे होणाऱ्या मोठ्या विसर्गासाठी शहर तयार होऊ शकणार नाही. आता जलविज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करून वेळीच उपाययोजना करायला हव्यात,’ अशी निरीक्षणे ‘आयसर’च्या शास्त्रज्ञांनी नोंदवल्याचे यादवाडकर यांनी सांगितले.
‘प्रकल्पात २४० हेक्टर हरित भागावर काँक्रीटचे बांधकाम करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे निर्माण होणारे पर्यावरणाचे धोके आणि परिसंस्थेचे नुकसान विचारात घेण्यात आलेले नाही,’ असेही अहवालातून नमूद करण्यात आले आहे. प्रकल्पामुळे पर्यावरणावर पडणाऱ्या प्रभावाचे स्वतंत्र मूल्यांकन तज्ज्ञांकडून करून घेण्याची अपेक्षा शास्त्रज्ञांनी अहवालात व्यक्त केल्याचे यादवाडकर यांनी सांगितले.
‘नदीसुधार प्रकल्पात वाजवी गृहीतकांच्या आधारे अतिवृष्टी आणि पूर विसर्गाचा अंदाज लावण्यात आलेला आहे. पूर पातळी ठरवण्यासाठी कृती समितीने स्वतःच्या अहवालातील अंदाजांपेक्षा २० ते ३० टक्क्यांनी कमी असलेले पाटबंधारे विभागाचे अंदाज वापरले आहेत. ‘महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थे’च्या अहवालातही पूर विसर्गाचा अंदाज जास्त आहे. असे असूनही पुराची पातळी कमी का ठरवण्यात आली,’ असा सवाल यादवाडकर यांनी उपस्थित केला.
‘आयसर’च्या अहवालातील ठळक नोंदी
- हवामान बदलांचे परिणाम विचारात घेण्यात आले नाहीत.
- पुराची पातळी कमी लेखली गेली.
- तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपाययोजना आवश्यक
प्रकल्पामुळे शहराला निर्माण झालेला धोका आता शास्त्रज्ञांनीही अधोरेखित केला आहे. या अहवालाकडे गांभीर्याने पाहायला हवे. सामान्य पुणेकरांनी आता जागृत होणे गरजेचे आहे.- सारंग यादवाडकर, पुणे-पिंपरी चिंचवड नदी पुनरुज्जीवन