पुणे : शहरातील कचरा उचलण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असतानाही अनेक रस्त्यांवरील कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारींची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महापालिका आयुक्तांनाच मंगळवारी खोटे उत्तर ऐकावे लागले. वारजे परिसरात पाहणीसाठी गेलेल्या आयुक्त नवल किशोर राम यांना कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळी कचरा उचलला होता. आताच कोणीतरी कचरा टाकला असावा’, असे उत्तर देऊन फसविण्याचा प्रयत्न केला.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम मंगळवारी आयुक्त वारजे भागात पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना महापालिकेचे कचरा गोळा करणारे तसेच रस्ता झाडणारे कर्मचारी आणि संबंधित अधिकारी ‘गायब’ असल्याचे दिसले. या भागातील एका रस्त्यावर कचऱ्याचे ढीग लागले होते. तेथे थांबून आयुक्तांनी संबधित अधिकाऱ्यांना फोन लावून बोलून घेतले आणि विचारणा केली. त्या वेळी सकाळीच सर्व कचरा उचलला होता. हा कचरा आता काही वेळापूर्वी कोणीतरी टाकला असेल असे उत्तर देत त्यांना फसविण्याचा प्रयत्न केला.
यानंतर आयुक्तांनी कचऱ्याचे निरीक्षण केले असता हा कचरा आठ ते दहा दिवस तसाच पडून असल्याचे निदर्शनास आणून दिल्याने उपस्थित कर्मचारी, अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यानंतर तातडीने हा कचरा उचलून नेण्यात आला, असा किस्सा खुद्द आयुक्तांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितला. घरोघरी कचरा गोळा करणाऱ्या स्वच्छ संस्थेच्या कामाबाबतही काही तक्रारी आहेत. शहरात खरेच चार हजार कर्मचारी काम करीत आहेत का? याची पडताळणी करण्यात येईल. त्यांची बँक खाती आहेत का? याचीदेखील माहिती घेण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.
‘एवढा पैसा जातो कुठे?’
महापालिका घनकचरा व्यवस्थापनावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. मात्र, त्यानंतरही शहरात कचरा दिसत आहे. एवढा पैसा जातो कुठे? खरेच एवढा पैसा खर्च करण्याची गरज आहे? असे प्रश्न उपस्थित करून महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या आठ दिवसांत शहरातील कचरा व्यवस्थापनामध्ये मोठे बदल करून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.