पुणे : ‘लोकमान्य टिळकांनी त्यांच्या कार्यातून युवकांसमोर यशस्वी होण्याचा मूलमंत्र दिला आहे. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते. यशस्वी होण्यासाठी सतत प्रयत्न करत राहणे, नव्या गोष्टी शिकण्याचा ध्यास असणे गरजेचे असते. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी चिकाटी ठेवा,’ असा सल्ला ज्येष्ठ उद्योजक डॉ. आनंद देशपांडे यांनी रविवारी दिला.
लोकमान्य स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. देशपांडे यांना ‘लोकमान्य टिळक सामाजिक एकात्मता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. चारूदत्त आफळे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, मृणाल गानू, कुणाल टिळक, आशिष जोशी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आफळे यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित कीर्तन सादर केले.
डॉ. देशपांडे म्हणाले, ‘लोकमान्य टिळकांनी सर्वसामान्यांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. त्यांनी जनमानसात स्वाभिमानाची भावना निर्माण केली. त्यांचे कार्य कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला प्रेरणा देणारे आहे. त्यातून यशस्वी होण्याचे सूत्र सापडते.’‘यशस्वी होण्यासाठी मोठे स्वप्न-ध्येय बघा, त्यानुसार धोरणे ठरवा. संस्थांची उभारणी करा. स्वत:च्या मूल्यांवर ठाम राहून काम करा. सतत शिकत राहण्याची वृत्ती जोपासा. जिद्द आणि चिकाटी अंगी बाळगा. सर्व काही गमावल्यानंतरही पुन्हा नव्याने उभे राहण्याची तयारी ठेवा. नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे व्हा.’ असा सल्ला डॉ. देशपांडे यांनी दिला.
‘महापुरुषांच्या विचारांनी इथली परंपरा-संकृती घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठा आदर्श आपल्यासमोर घालून दिला आहे. त्यांचा विचार पुढे नेणारे अनेक विचारवंत इथे जन्मले. त्यात लोकमान्य टिळकांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. लोकमान्यांनी स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा नवा विचार दिला. त्यांच्यानंतरही ही परंपरा पुढे जात राहिली. या महापुरुषांनी दिलेला वारसा आता पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. महापुरुषांचे विचार पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे,’ असे मृणाल कुलकर्णी म्हणाल्या.
‘पुण्यातील गणेशोत्सवाचे दहा दिवस अधिक उत्साहाने आणि लोकमान्य टिळकांना समर्पित असलेले, त्यांच्या विचारांचा वारसा देणाऱ्या कार्यक्रमांनी साजरे होण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहे.’ अशी ग्वाही कुणाल टिळक यांनी दिली.