पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज, सोमवार (९ जून) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणासंर्भातील चर्चा आणि मंगळवारी होणाऱ्या वर्धापनदिन तसेच माळेगाव सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीनिमित्त हे दोघे एकत्र येणार असल्याने बैठकीची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सातत्याने होत आहे. त्यातच एकत्र येण्यासंदर्भातील निर्णय अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे घेतील, असे शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते. गेल्या काही महिन्यांत शरद पवार आणि अजित पवार सातत्याने बैठकीनिमित्त भेटत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, बारामती येथील ॲग्रिकल्चर डेव्हलमेंट ट्रस्ट, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय), महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशच्या वतीने सोमवारी (९ जून) ही बैठक व्हीएसआय येथे होणार आहे. ‘ऊस उत्पादकतेत वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ या विषयावर ही बैठक होईल. शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील, बी. बी. ठोंबरे, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्यासर अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.