गेल्या आठ वर्षांत पुण्यातील नवउद्यमींमध्ये दीड हजार दशलक्ष डॉलर्सहून अधिक गुंतवणूक झाली आहे. त्यापैकी जवळपास ५० टक्के, म्हणजे ७७३.९४ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक २०२० आणि २०२१ या दोनच वर्षांत झाली आहे. त्यामुळे करोना काळात आर्थिक अडचणी निर्माण होऊनही गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक गुंतवणूक करोना काळातील दोन वर्षांतच झाल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड एंटरप्राइज आणि पॉझिव्ह्यू व्हेंचर्स यांनी संयुक्तरीत्या पुण्यातील नवउद्यमींमध्ये झालेल्या गुंतवणुकीचा अभ्यास करून ‘इन्व्हेस्टर सेंटिमेन्ट्स अँड इमर्जन्स ऑफ टायर २ सिटी – पुणे ॲज स्टार्टअप डेस्टिनेशन’ अहवाल तयार केला आहे. या अभ्यासगटामध्ये केंद्राच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, सनदी लेखापाल विनित देव आणि सनदी लेखापाल प्राजक्ता शेट्ये देव यांचा समावेश आहे. या अभ्यासात २१४ ते २०२१ या आठ वर्षांत पुण्यातील नवउद्यमींमध्ये झालेल्या गुंतवणुकीचा तपशील देण्यात आला आहे. या काळात गुंतवणुकीचे एकूण १४४ व्यवहार झाले. त्यातील ६८ व्यवहार केवळ २०२० आणि २०२१ या दोन वर्षांत झाले. आठ वर्षांत गुंतवणुकीचे सर्वाधिक व्यवहार २०१९ (२३) आणि २०२१ (५१) या दोन वर्षांत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गेल्या आठ वर्षांत पुण्यातील नवउद्यमींमध्ये १४४ व्यवहारांतून एकूण १ हजार ५०७ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक झाली. त्यात २०१४ ते २०१७ या चार वर्षांत सहा ते आठ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक झाली. मात्र २०१८ पासून नवउद्यमींतील गुंतवणुकीने वेग घेतला. २०१८ मध्ये १९५.७८ दशलक्ष डॉलर्स, २०१९ मध्ये ३.३.५४ दशलक्ष डॉलर्स, २०२०मध्ये १९९.८९ दशलक्ष डॉलर्स, २०२१मध्ये ५४७.७१ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

माहिती संकलनाद्वारे पुण्यातील नवउद्यमींतील गुंतवणुकीबाबत तयार केलेला सर्वेक्षण अहवाल नक्कीच उपयुक्त आणि महत्त्वाचा आहे. संदर्भासाठी हा अहवाल वापरता येऊ शकतो. पुण्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील नवउद्यमींमध्ये सातत्याने वाढणारी गुंतवणूक प्रोत्साहनकारक आहे. पुण्यातील नवउद्यमींमध्ये कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रातील नवउद्यमींचेही प्राबल्य अधोरेखित होते ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. पुण्यात उत्पादन आणि तंत्रज्ञान ही दोन क्षेत्रे महत्त्वाची असल्याने येत्या काळात या दोन्ही क्षेत्रांचा मिलाफ करून स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या नवउद्यमी निर्माण होणे आवश्यक आहे.

– प्रशांत गिरबने, महासंचालक, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर

करोना काळातील आर्थिक परिस्थिती पाहता गुंतवणुकीचे व्यवहार होण्याची अपेक्षा नव्हती. प्रत्यक्षात गेल्या आठ-नऊ वर्षांत जे होऊ शकले नाही, ते गेल्या वर्षभरात झाले. पुण्यात गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार उत्सुक आहेत. विशेष म्हणजे, गुंतवणूक केलेल्यांमध्ये सर्वाधिक गुंतवणूकदार हे पुण्याबाहेरचे आहेत. त्यामुळे पुण्यातील नवउद्यमींमध्ये अन्य ठिकाणच्या गुंतवणूकदारांना रस असल्याचे दिसून येते. येत्या काळात पुणे हे देशाचे नवउद्यमी केंद्र होण्याची वाटचाल सुरू झाली आहे असे नक्कीच म्हणता येईल.

– डॉ. अपूर्वा पालकर, संचालक, सेंटर फॉर इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड एंटरप्राइज

गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक गुंतवणूक झालेली नवउद्यमी क्षेत्रे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या दोन वर्षांत वित्ततंत्रज्ञान, थेट ग्राहकांपर्यंत (डीटूसी), लॉजिस्टिक्स, कृषी तंत्रज्ञान, आरोग्य, रोबोटिक्स या क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक झाल्याचे निदर्शनास येते. तर गेल्या वर्षभरात जैवतंत्रज्ञान, डीप टेक, गेमिंग, पुनर्वापरायोग्य ऊर्जा (रिन्यूएबल एनर्जी), सेवा तंत्रज्ञान या सहा नव्या क्षेत्रांत जवळपास १४.५ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

पुण्यात चार युनिकॉर्न स्टार्टअप

गेल्या काही वर्षांत पुण्यातील नवउद्यमींतून युनिकॉर्न्सही घडले आहेत. एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त मूल्य असलेल्या नवउद्यमीला युनिकॉर्न म्हटले जाते. या निकषावर फर्स्ट क्राय, आयसरटिस, माईंडटिकल आणि ध्रुवा या चार नवउद्यमी युनिकॉर्न्स झाल्या आहेत