पाणीटंचाईमुळे शहरात सुरू असलेला एक दिवसाआड पाणीपुरवठा गणेशोत्सवाच्या काळातही कायम राहणार आहे. उत्सवाच्या काळात रोज किंवा चार दिवस संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्याऐवजी सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणे पाणीपुरवठा सुरू ठेवावा, असा निर्णय महापालिका पक्षनेत्यांच्या बैठकीत बुधवारी एकमताने घेण्यात आला.
उत्सावाच्या काळात शहराला रोज पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात येत होती. तसेच शहरात सध्या पाणीपुरवठय़ासाठी जे वेळापत्रक आहे, त्या ऐवजी उत्सवात १७, २०, २५ आणि २७ या चार दिनांकांना संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करता येईल का, याबाबतही चर्चा सुरू होती. अशाप्रकारे चार दिवस पाणीपुरवठा पुरवठा करायचा झाल्यास तो कशाप्रकारे करता येईल याचा विचार करून त्याचा अहवाल पक्षनेत्यांच्या बैठकीत सादर करावा, असे सोमवारी महापालिका प्रशासनला सांगण्यात आले होते.
महापालिका पक्षनेत्यांची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती. महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उत्सवाच्या काळात चार दिवस शहराला पाणीपुरवठा करण्यासंबंधी झालेल्या मागणीबाबत चर्चा करण्यात आली. मात्र एकूण परिस्थिती पाहता असा निर्णय घेता येणार नाही, असा सूर बैठकीत निघाला. एक दिवसाआड पाणीपुरवठय़ाऐवजी चार दिवस संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावावर प्रशासनही राजी नव्हते. त्यामुळे सध्या ज्या पद्धतीने शहराला पाणीपुरवठा केला जात आहे, त्याच पद्धतीने पुढेही पाणीपुरवठा सुरू ठेवावा. त्या वेळापत्रकात कोणताही बदल करू नये, असा निर्णय घेण्यात आला.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अद्यापही निम्माच पाणीसाठा झालेला आहे. धरणांच्या क्षेत्रातही अद्याप पाऊस झालेला नाही. धरणात साठा नसल्यामुळे चार दिवस संपूर्ण शहराला देण्याबाबत प्रशासनही राजी नव्हते. त्यामुळे चार दिवस पाणी देण्याच्या प्रस्तावावर निर्णय न घेता सध्याच्याच पद्धतीने पाणीपुरवठा सुरू ठेवावा, असा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे महापौर धनकवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.