पुणे : गणेश पेठेतील हमजेखान चौकात दुकानाची भिंत कोसळून गंभीर जखमी झालेल्या एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. लक्ष्मण रामचंद्र माळी (वय ५५, रा. शनिवार पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. गणेश पेठेतील हमजेखान चौकाजवळ नियोजित बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. बांधकाम प्रकल्पाशेजारी गॅलक्सी कपड्यांचे दुकान आहे. मंगळवारी दुपारी दुकान स्थलांतरित करण्याचे काम सुरू होते. माळी दुकानातील माल हलवित होते. त्या वेळी दुकानाशेजारी असलेली भिंत कोसळली आणि माळी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. या घटने्ची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली. जवान संजय गायकवाड आणि परिसरातील नागरिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माळी यांना बाहेर काढले.

गंभीर जखमी झालेल्या माळी यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.