scorecardresearch

Premium

पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यासाठी एक महिन्याची मुदत

पुनर्मूल्यांकनाचा अर्ज दिल्यानंतर विद्यार्थ्यांला एका महिन्याच्या आत निकाल देणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यासाठी एक महिन्याची मुदत

पुणे विद्यापीठाच्या परीक्षांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल उशिरा जाहीर होत असल्यामुळे विद्यापीठाचा परीक्षा विभाग गेली दोन वर्षे सातत्याने चर्चेत आहे. यावर विद्यापीठाने तोडगा काढला असून एक महिन्याच्या कालावधीमध्ये पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
पुणे विद्यापीठाच्या गेल्या अनेक परीक्षांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल वेळेवर जाहीर होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी विद्यापीठाकडे सातत्याने केल्या जात होत्या. ज्याप्रमाणे परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांमध्ये निकाल जाहीर करण्याचा नियम आहे, त्याचप्रमाणे पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यासाठीही कालावधी निश्चित करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, कायद्यामध्ये पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यासाठी कालावधी नेमून दिलेल्या नसल्यामुळे असा नियम करता येऊ शकत नाही, अशी भूमिका विद्यापीठाने घेतली होती. या पाश्र्वभूमीवर विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या अधिसभेमध्येही पुनर्मूल्यांकनाचे निकष जाहीर करण्यासाठी कालमर्यादा ठेवण्याचा प्रस्ताव मांडला होता.
विद्यापीठाने या सर्व पाश्र्वभूमीवर पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी निश्चित केला आहे. पुनर्मूल्यांकनाचा अर्ज दिल्यानंतर विद्यार्थ्यांला एका महिन्याच्या आत निकाल देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. याबाबत पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले,‘‘पुनर्मूल्यांकनाचे निकाल एक महिन्याच्या कालावधीमध्ये जाहीर करण्याबाबत विद्यापीठाच्या परीक्षा मंडळामध्ये आणि व्यवस्थापन परिषदेमध्ये ठराव मंजूर झाला आहे. मात्र, नियमांमध्ये बदल करण्यासाठी त्याला कुलपतींची मंजूरी येणे आवश्यक असते. परीक्षा विभागाशी संबंधित नियमांमधील बदल आणि अध्यादेश कुलपतींच्या संमतीसाठी पाठवण्यात आले आहेत. कुलपतींनी संमती दिल्यानंतर या नियमांची अंमलबजावणी सुरू होईल.’’

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: One month limits for revaluation of exam

First published on: 19-11-2013 at 02:39 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×